गुहागर: पालशेत हायस्कूल इमारतीचा भाग कोसळल्याची एक अत्यंत चिंताजनक घटना गुहागर तालुक्यात घडली आहे. गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे तालुक्यात अनेक ठिकाणी पडझड आणि नुकसानीच्या घटना घडत आहेत. गेले दोन दिवस सलग पडल्यानंतर बुधवारी सकाळी पावसाने काही काळ उसंत घेतली होती, मात्र त्यानंतर पुन्हा जोरदार हजेरी लावली. याच मुसळधार पावसाच्या तडाख्यामुळे तालुक्यातील प्रसिद्ध ‘पालशेत हायस्कूल’ इमारतीसमोरील काही भाग अचानक पत्त्यासारखा कोसळला. सुदैवाने शाळा भरण्याच्या वेळेव्यतिरिक्त ही घटना घडल्यामुळे मोठी दुर्घटना टळली असली, तरी या घटनेने जुन्या व नादुरुस्त शाळांच्या इमारतींचा आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा गंभीर बनवला आहे.
झाड कोसळल्याने रस्ते वाहतूक ठप्प; कुंभारवाडीत घराचे नुकसान
गुहागर शहर आणि ग्रामीण भागात पावसाचा जोर प्रचंड असल्याने केवळ शाळेची इमारतच नव्हे, तर इतर ठिकाणीही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. ‘आरे बाजीप्रभू रोड ते लुंबिनीनगर ब्राम्हणवाडी कुंभवणेवाडी’ या मुख्य रस्त्यावर एक मोठे झाड उन्मळून पडल्याने या मार्गावरील वाहतूक काही काळासाठी पूर्णपणे ठप्प झाली होती. याशिवाय, पालपेणे कुंभारवाडी येथील स्थानिक रहिवासी मारुती पिरदनकर यांच्या घरावरही एक झाड कोसळल्याची घटना घडली. या अपघातात पिरदनकर यांच्या घराचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.
जिल्हा परिषद सदस्या अपूर्वा बारगोडे यांच्याकडून घटनास्थळाची पाहणी
पालशेत हायस्कूलच्या इमारतीचा भाग कोसळल्याची माहिती मिळताच रत्नागिरी जिल्हा परिषद सदस्या अपूर्वा बारगोडे यांनी तातडीने सहकाऱ्यांसह हायस्कूलला भेट दिली. त्यांनी कोसळलेल्या भागाची प्रत्यक्ष पाहणी करून परिस्थितीचा आढावा घेतला. यानंतर त्यांनी हायस्कूलच्या मुख्याध्यापकांशी या गंभीर विषयावर सविस्तर चर्चा केली. यावेळी पंचायत समिती सदस्या मानसी रांगले आणि महेश तोडणकर यांच्यासह स्थानिक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शाळा प्रशासनाच्या कारभारावर संताप आणि प्रश्नचिन्ह: सदर हायस्कूलची इमारत आधीपासूनच अत्यंत नादुरुस्त आणि धोकादायक झाली होती. असे असतानाही शाळा प्रशासनाने आणि शिक्षण विभागाने उन्हाळी सुट्टीच्या प्रदीर्घ काळात या इमारतीवर कोणतीही डागडुजी किंवा आवश्यक ती कारवाई का केली नाही? तसेच या जुन्या इमारतीचे ‘स्ट्रक्चरल ऑडिट’ (Structural Audit) केले गेले होते की नाही? असे अनेक संतप्त आणि टोकदार प्रश्न जिल्हा परिषद सदस्या अपूर्वा बारगोडे यांनी मुख्याध्यापकांसोबत झालेल्या चर्चेदरम्यान उपस्थित केले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:07 25-06-2026













