आमदार शेखर निकम यांच्या तारांकित प्रश्नावर सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांचे उत्तर
चिपळूण: कुंभार्ली, आंबेनळी घाटातील अपघात टाळण्यासाठी शासनाने विशेष सुरक्षा आराखडा तयार केला असून, या दोन्ही घाटांमधील सुरक्षिततेची कामे प्रगतीपथावर असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी विधानसभेत दिली. कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राला जोडणाऱ्या या दोन्ही अत्यंत महत्त्वाच्या घाटांच्या सुरक्षिततेबाबत चिपळूणचे आमदार शेखर निकम यांनी विधानसभा पावसाळी अधिवेशनात आवाज उठवला होता. घाटांमधील वाढते अपघात आणि प्रवाशांचा जीव धोक्यात येत असल्याच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांनी शासनाची भूमिका स्पष्ट करत या दोन्ही घाटांसाठी व्यापक सुधारणा आराखडा निश्चित झाल्याचे सांगितले.
आंबेनळी आणि कुंभार्ली घाटांमधील भीषण अपघातांची पार्श्वभूमी
आमदार शेखर निकम यांनी घाटांमधील भीषण परिस्थितीकडे सभागृहाचे लक्ष वेधले. आंबेनळी घाटात यापूर्वी कोकण कृषी विद्यापीठाची बस दरीत कोसळून ३४ कर्मचाऱ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. तसेच काही महिन्यांपूर्वी याच घाटात ८ तरुणांच्या गाडीला अपघात होऊन त्यांना आपला जीव गमवावा लागला होता.
दुसरीकडे, चिपळूण-कराड मार्गावरील कुंभार्ली घाटाची परिस्थितीही चिंताजनक बनली आहे. या ठिकाणी आवश्यक त्या ठिकाणी संरक्षक भिंती नसल्याने अनेकदा वाहने थेट दरीत कोसळून प्रवाशांचा मृत्यू होतो. अनेक अवघड वळणांवर आवश्यक तिथे भिंती नसून, अनावश्यक ठिकाणी मात्र संरक्षक भिंती बांधल्या गेल्याचा मुद्दा आ. निकम यांनी उपस्थित केला. ज्या ठिकाणी खोल दरी आणि अवघड वळण आहे, अशा ठिकाणी आरसीसी (RCC) संरक्षक कठडे बांधण्याची मागणी त्यांनी लावून धरली.
कंत्राटदार बदलामुळे कामाला विलंब; आता नवी यंत्रणा कार्यरत
आमदार निकम यांच्या प्रश्नाला उत्तर देताना सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी सांगितले की, पाटण-चिपळूण मार्गावरील कुंभार्ली घाट आणि पोलादपूर-महाबळेश्वर दरम्यानचा आंबेनळी घाट या दोन्ही घाटांमधील कामे सुरू आहेत.
काही तांत्रिक अडचणी आणि कंत्राटदार बदलांमुळे पूर्वी या कामांना काहीसा विलंब झाला होता. मात्र, आता नवीन यंत्रणा नेमण्यात आली असून घाटांमधील कामे अत्यंत वेगाने आणि प्रगतीपथावर सुरू आहेत.
सुरक्षा आराखड्यात क्रॅश बॅरियर्स आणि व्यापक सुधारणांचा समावेश
शासनाने तयार केलेल्या नवीन सुरक्षा आराखड्यानुसार, भविष्यातील अपघात पूर्णपणे टाळण्यासाठी दोन्ही घाटांमध्ये आधुनिक उपाययोजना केल्या जात आहेत. यामध्ये आवश्यक ठिकाणी रस्त्यांचे मार्किंग करणे, सुरक्षेच्या दृष्टीने सुयोग्य बदल करणे, अतिधोकादायक वळणांवर मजबूत क्रॅश बॅरियर्स (Crash Barriers) बसवणे आणि इतर प्रवासी सुविधांचा समावेश करण्यात आला आहे.
याशिवाय, आंबेनळी घाटातील जुन्या अपघातग्रस्त स्थळांचा विशेष आढावा घेण्यात आला असून, दोन्ही घाटांमधील प्रवाशांचा प्रवास सुरक्षित करण्यासाठी शासन कोणतीही कसर ठेवणार नाही, अशी ग्वाही मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी दिली.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
15:19 25-06-2026














