रत्नागिरी: कोकण किनारपट्टीवरील रत्नागिरी जिल्ह्यात बंदी असतानाही मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीर एलईडी (LED) दिव्यांच्या साहाय्याने मासेमारी होत असल्याचा गंभीर मुद्दा विधानसभेत चांगलाच गाजला आहे. गुहागरचे आमदार भास्कर जाधव यांनी तारांकित प्रश्नाद्वारे रत्नागिरीतील समुद्रात शेकडो बोटींद्वारे सुरू असलेल्या बेकायदेशीर एलईडी मासेमारीवरून शासनाला धारेवर धरले. या मासेमारीमुळे स्थानिक पारंपरिक मच्छीमारांचे भवितव्य धोक्यात आले असून, त्यांच्या उपजीविकेवर मोठा परिणाम झाल्याकडे त्यांनी सभागृहाचे लक्ष वेधले.
आमदार भास्कर जाधव यांनी केवळ प्रश्नच उपस्थित केला नाही, तर मत्स्य व्यवसाय विभागाचे अधिकारी आणि बेकायदेशीर नौका मालक यांच्यात संगनमत (साटलोटे) असल्याचा थेट आरोप केला. अधिकारी या प्रकाराकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचे त्यांनी म्हटले.
शासनाचे स्पष्टीकरण: आरोप फेटाळले, आकडेवारी केली जाहीर
मत्स्य व्यवसाय विभाग मंत्री नितेश राणे यांनी या सर्व आरोपांचे जोरदार खंडन करत लेखी उत्तरामार्फत शासनाची भूमिका स्पष्ट केली. अधिकारी व नौका मालकांच्या संगनमताचा आरोप फेटाळून लावताना, अनधिकृत एलईडी मासेमारीला आळा घालण्यासाठी सुधारित सागरी कायद्यानुसार जास्तीत जास्त शास्तीची (दंडाची) तरतूद केल्याचे त्यांनी सांगितले.
शासनाने दिलेल्या उत्तरात खालील प्रमुख मुद्दे मांडले आहेत:
- उत्पादनात घट नाही: पारंपरिक मच्छीमारांना मासे मिळत नसल्याचा आरोप नाकारताना, मागील तीन वर्षांतील मत्स्योत्पादनाची आकडेवारी पाहता उत्पादनात कोणतीही घट झालेली नाही, त्यामुळे मच्छीमारांच्या उपजीविकेवर परिणाम झाल्याचे म्हणणे योग्य नाही, असे शासनाने स्पष्ट केले.
- कडक कारवाई व दंड वसुली: २३ नोव्हेंबर २०२१ ते मे २०२६ या कालावधीत महाराष्ट्र सागरी मासेमारी नियमन अधिनियम (सुधारणा) २०२१ च्या कायद्यानुसार एकूण १३१ अनधिकृत एलईडी मासेमारी नौकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईतून आतापर्यंत १ कोटी ५९ लाख रुपयांचा महसूल दंड स्वरूपात वसूल करण्यात आला आहे.
- २०१८ पासून पूर्ण बंदी: राज्यात २७ एप्रिल २०१८ च्या अधिसूचनेनुसार जलधी क्षेत्रात एलईडी लाईट साहित्य वापरून मासेमारी करण्यास पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे.
सुरक्षेसाठी आधुनिक तंत्रज्ञान: ३ ड्रोन तैनात
सध्याच्या स्थितीत रत्नागिरी जिल्ह्यात बेकायदेशीर मासेमारी रोखण्यासाठी सुरक्षा यंत्रणा अधिक कडक करण्यात आली आहे. समुद्रात चोवीस तास देखरेख ठेवण्यासाठी अतिवेगवान गस्ती नौकांचा वापर केला जात असून, आधुनिक तंत्रज्ञानाचा भाग म्हणून ३ ड्रोन तैनात करण्यात आले आहेत.
प्रशासनाकडून कोणतीही दिरंगाई किंवा दुर्लक्ष होत नसून बेकायदेशीर मासेमारीविरुद्ध कठोर मोहीम सुरू असल्याचे शासनाने आपल्या उत्तरात शेवटी स्पष्ट केले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:12 03-07-2026














