१० वर्षांपेक्षा अधिक सेवा झालेल्या कर्मचाऱ्यांचे होणार सेवा समायोजन; पात्र उमेदवारांना मिळणार थेट नियुक्ती
रत्नागिरी:
Ratnagiri NHM Employees म्हणजेच राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत (NHM) रत्नागिरी जिल्ह्यात कंत्राटी पद्धतीने कार्यरत असलेल्या शेकडो कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत आनंदाची आणि दिलासादायक बातमी आहे. राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत राज्यभरात सलग १० वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक काळ सेवा पूर्ण केलेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांची पदे आता कायम करण्याचा ऐतिहासिक निर्णय शासनाने घेतला आहे. या धोरणात्मक निर्णयामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील तब्बल २५० पात्र कंत्राटी कर्मचाऱ्यांना थेट शासकीय सेवेत कायम होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
राज्यातील १५ हजार ९१० कंत्राटी कर्मचाऱ्यांचे होणार समायोजन
शासनाने घेतलेल्या या निर्णयामुळे केवळ रत्नागिरीच नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्रातील १५ हजार ९१० कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या सेवा समायोजनाचा प्रदीर्घ काळापासून प्रलंबित असलेला प्रश्न अखेर सुटला आहे. या कर्मचाऱ्यांसाठी समकक्ष वेतनश्रेणीतील अधिसंख्य पदे निर्माण करण्यास आणि त्यासाठी आवश्यक असणाऱ्या वार्षिक निधीलाही शासनाने मान्यता दिली आहे. यापूर्वी १४ मार्च २०२४ रोजी आणि त्यानंतर ४ नोव्हेंबर २०२५ रोजीच्या मंत्रिमंडळ बैठकीत या निर्णयाला गती देण्यात आली होती. त्यानुसार मंगळवारी ३० जून रोजी या संदर्भातील अधिकृत शासन निर्णय (GR) जारी करण्यात आला आहे.
मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती; अशी निश्चित होणार पात्रता
या कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या सेवा समायोजनासाठी आणि निकष निश्चित करण्यासाठी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली एक उच्चस्तरीय आंतरविभागीय समिती स्थापन करण्यात आली होती. या समितीच्या शिफारशी आणि २५ जून रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीतील मंजुरीनुसार खालील निकषांच्या आधारे पदे निर्माण करून पात्र कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली जाईल:
- कामाचे स्वरूप व जबाबदाऱ्या: संबंधित कंत्राटी पदाच्या कामाचे स्वरूप आणि निश्चित जबाबदाऱ्या विचारात घेतल्या जातील.
- शैक्षणिक पात्रता व सेवा प्रवेश नियम: पदासाठी आवश्यक असलेली शैक्षणिक पात्रता आणि सेवा प्रवेश नियमांची पूर्तता तपासली जाईल.
- वेतनश्रेणी निश्चिती: कर्मचाऱ्यांचे सध्याचे मानधन आणि सातव्या वेतन आयोगानुसार लागू असलेली वेतनश्रेणी यांचा प्रामुख्याने विचार केला जाणार आहे.
- वित्त विभागाची मान्यता: वित्त विभागाची आवश्यक मान्यता घेतल्यानंतर संबंधित विभागांकडून विशेष अधिसंख्य पदे निर्माण करून नियुक्ती दिली जाईल.
“आरोग्य विभागाला होणार मोठा फायदा”
जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये यांनी या ऐतिहासिक निर्णयाचे स्वागत केले आहे. ते म्हणाले,
“राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कार्यरत १० वर्षांपेक्षा अधिक सेवा पूर्ण केलेल्या कर्मचाऱ्यांची पदे शासनाकडून निर्माण केली जाणार आहेत. याचा थेट फायदा जिल्ह्यात १० वर्षांपेक्षा जास्त काळ काम केलेल्या २३६ कंत्राटी कर्मचाऱ्यांना (अंदाजे २५०) होणार आहे. या अनुभवी मनुष्यबळामुळे आरोग्य विभागाच्या सक्षमीकरणाला मोठी मदत होणार आहे.”
वारस अनुकंपा नियुक्ती लागू नाही!
या शासन निर्णयात एक महत्त्वाची अट स्पष्ट करण्यात आली आहे. ही निर्माण करण्यात येणारी अधिसंख्य पदे पूर्णपणे ‘व्यक्तिसापेक्ष’ असणार आहेत. याचा अर्थ असा की, संबंधित कर्मचारी सेवानिवृत्त झाल्यानंतर, त्यांनी राजीनामा दिल्यानंतर किंवा अन्य कोणत्याही कारणाने त्यांची सेवा संपुष्टात आल्यानंतर ही पदे आपोआप रद्द केली जातील. त्यामुळे या जागांवर भविष्यात कोणतीही नवीन भरती किंवा कर्मचाऱ्यांच्या वारसांना अनुकंपा तत्त्वावर नियुक्ती मिळणार नाही, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:41 03-07-2026














