पालकमंत्री डॉ. उदय सामंत घटनास्थळी दाखल
खेड: रत्नागिरी जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे खेड तालुक्यातील दहिवली शेलारवाडी येथे सोमवार, ६ जुलै रोजी रात्री सव्वानऊ वाजण्याच्या सुमारास भीषण भूस्खलनाची (Landslide) घटना घडली आहे. डोंगराचा कडा खचून झालेल्या या भूस्खलनामुळे एका घराचा काही भाग कोसळला आणि घरातील तिघेजण ढिगाऱ्याखाली अडकले. या दुर्घटनेत ७५ वर्षीय वृद्ध महिला कल्पना शेलार यांना ग्रामस्थांच्या तत्परतेमुळे सुखरूप बाहेर काढण्यात यश आले असून, ८५ वर्षीय शांताराम बाळा शेलार आणि ३५ वर्षीय सतीश शेलार हे अद्यापही ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त होत आहे.
Khed Landslide Updates: ग्रामस्थांच्या तत्परतेमुळे वृद्ध महिलेला जीवदान; कळबणी रुग्णालयात उपचार सुरू
दहिवली शेलारवाडी येथे रात्रीच्या वेळी अचानक दरड कोसळल्याने परिसरात एकच घबराट निर्माण झाली. मात्र, घटनेची माहिती मिळताच स्थानिक ग्रामस्थांनी तातडीने धाव घेत बचावकार्य सुरू केले. ग्रामस्थांच्या याच तत्पर मदतीमुळे ढिगाऱ्याखाली दबलेल्या ७५ वर्षीय कल्पना शेलार यांना वेळेत बाहेर काढण्यात आले. सध्या त्यांच्यावर कळबणी येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
युद्धपातळीवर बचावकार्य सुरू; दोघे अद्यापही बेपत्ता
दुर्घटनाग्रस्त घराच्या ढिगाऱ्याखाली शांताराम बाळा शेलार (वय ८५) आणि सतीश शेलार (वय ३५) हे दोघेजण अडकल्याची माहिती समोर आली आहे. बेपत्ता असलेल्या या दोन्ही व्यक्तींचा शोध घेण्यासाठी सध्या घटनास्थळावर युद्धपातळीवर शोध व बचावकार्य राबवले जात आहे.
प्रांताधिकारी आणि तहसीलदारांसह प्रशासकीय यंत्रणा घटनास्थळी दाखल; नागरिकांना सतर्कतेचा इशारा
घटनेची गांभीर्य लक्षात घेऊन खेडच्या प्रांताधिकारी वैशाली पाटील, तहसीलदार, खेड पोलीस तसेच महसूल आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाचे अधिकारी व कर्मचारी रात्रीच घटनास्थळी दाखल झाले आहेत. प्रशासनाकडून बचावकार्याचे थेट नियंत्रण केले जात आहे.
दरम्यान, खेड तालुका आणि दहिवली परिसरात अजूनही मुसळधार पाऊस सुरूच आहे. या सातत्यपूर्ण पावसामुळे दुर्घटनास्थळाच्या शेजारील काही घरे सध्या अत्यंत धोकादायक स्थितीत आली आहेत. संभाव्य धोका टाळण्यासाठी प्रशासनाने परिसरातील नागरिकांना तात्काळ सुरक्षित स्थळी स्थलांतरित होण्याचे आणि पूर्णपणे सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.
पालकमंत्री डॉ. उदय सामंत घटनास्थळी दाखल
दरम्यान, सोमवारी रात्री झालेल्या भीषण भूस्खलनाची घटना समजल्यानंतर राज्याचे उद्योग मंत्री तथा रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ.उदय सामंत यांनी तातडीने आज सकाळी 6 वाजण्याचा सुमारास घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. तसेच या ठिकाणी आणि आजूबाजूच्या परिसरातील कुटुंबांना स्थलांतरित करण्याचे आदेश सुद्धा पालकमंत्री ना. उदय सामंत यांनी दिले.

यावेळी जिल्हा परिषद सदस्य अण्णा कदम, तालुकाप्रमुख सचिन धाडवे, खेडच्या प्रांतअधिकारी वैशाली माने, उपविभागीय पोलीस अधिकारी शैलेश सणस, व अन्य प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:34 07-07-2026














