संगमेश्वर : लोवले येथील शुभम दोर याने झेंडू पीक घेत मिळवला शाश्वत रोजगार

कडवई : आजकाल कोकणातला तरुण मुंबई, पुणे यांसह अन्य मोठ्या शहरांकडे नोकरीसाठी धाव घेतो. पण काही तरुण याला अपवाद असतात. लोवले येथील शुभम दोरकडे याने यंदा झेंडूची लागवड करत उत्पन्न घेण्याचा यशस्वी प्रयत्न केला आहे.

शुभम याने दापोली कृषी विद्यापीठातून पदवी घेतली. त्यानंतर त्याने त्या ज्ञानाचा आणि स्वतःच्या आवडीचा उपयोग करत स्वतःच्या शेतजमिनीत विविध प्रयोग करण्यास सुरुवात केली. या आधी त्याने कलिंगड लागवड, भाजीपाला लागवड, कुळीथ लागवड, पारंपरिक भात लागवड असे प्रयोग यशस्वीरीत्या केले आहेत. त्याचबरोबर गांडूळ खतनिर्मिती, फुल रोपवाटिकाही तयार केली आहे.

यंदा मात्र शुभम दोरकडे याने झेंडू लागवड केली आहे. त्याच्याकडून देण्यात आली. नऊ गुंठे जागेत त्याने ही लागवड केली आहे. त्यासाठी आवश्यक रोप त्याने विकत न घेता स्वतः घरी रुजवून काढली. पिवळ्या झेंडूसाठी त्याने पितांबरी आणि केशरी झेंडूसाठी कलकत्ता हे जात वापरली आहे. ४०० रोपांची लागवड त्याने केली आहे.

यासाठी त्याला सुमारे १५ हजारांचा खर्च आला. खत नियोजनातही रासायनिक खतांचा वापर कमी करत ६० टक्के सेंद्रिय खतांचा वापर केल्याचे त्याने सांगितले. जमिनीतून आणि फवारणीद्वारा त्याने ही खते दिली आहेत. शुभमला या लागवडीतून ४०० किलो उत्पन्नाची अपेक्षा आहे. आतापर्यंत २५० किलो उत्पन्न त्याला मिळाले आहे, अशी माहिती त्याच्याकडून देण्यात आली.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
04:00 PM 05/Nov/2024