Raghuveer Ghat Closed: रघुवीर घाट पर्यटकांसाठी १ महिना बंद; जिल्हा प्रशासनाचा मोठा निर्णय

Raghuveer Ghat Closed: ९ जुलै ते १० ऑगस्ट २०२६ दरम्यान घाटात पर्यटनास पूर्ण बंदी; भूस्खलन आणि रस्ता खचल्याने उपविभागीय दंडाधिकारी वैशाली पाटील यांचे प्रतिबंधात्मक आदेश

खेड: Raghuveer Ghat Closed | पावसाळी पर्यटनासाठी संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेला खेड तालुक्यातील निसर्गरम्य रघुवीर घाट पर्यटकांसाठी दि. ९ जुलैपासून ते दि. १० ऑगस्ट २०२६ पर्यंत तात्पुरत्या स्वरूपात पूर्णपणे बंद करण्यात आला आहे. पावसाळ्यात डोंगराळ भागात मोठ्या प्रमाणावर दरड कोसळण्याची आणि त्यातून जीवितहानी होण्याची तीव्र शक्यता लक्षात घेऊन, खेडच्या उपविभागीय दंडाधिकारी वैशाली पाटील यांनी हे कडक प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत.

राष्ट्रीय महामार्ग क्र. ४६१ वर रस्ता खचला; डांबरी रस्त्याला पडले तडे

रघुवीर घाटातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्र. ४६१ ची सद्यस्थिती अत्यंत धोकादायक बनली आहे. महामार्गाच्या साखळी क्र. १०३/०० ते १०४/०० दरम्यान दरीकडील बाजूची रस्त्याची कडा पूर्णपणे तुटली आहे. याशिवाय, कि.मी. १००/५०० ते १०५/५०० च्या दरम्यान डांबरी पृष्ठभाग आणि बाजूची साईडपट्टी मोठ्या प्रमाणावर खचली आहे. सततच्या पावसामुळे डोंगरावरील माती आणि मोठे दगड रस्त्यावर आले असून डांबरी रस्त्याला ठिकठिकाणी गंभीर तडे गेले आहेत. यामुळे या मार्गावर मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

जड आणि खासगी वाहनांना नो-एन्ट्री; एसटी आणि अत्यावश्यक सेवांना सवलत

या प्रतिबंधात्मक आदेशानुसार, घाटातील वाहतुकीवर अनेक मर्यादा घालण्यात आल्या आहेत:

  • या वाहनांना बंदी: सर्व प्रकारची जड-अवजड वाहने आणि इतर सर्व प्रकारच्या खासगी वाहनांना (पर्यटकांच्या गाड्या) घाटात प्रवेश करण्यास पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे.
  • या वाहनांना परवानगी: केवळ अत्यावश्यक सेवेतील चारचाकी वाहने आणि एसटी महामंडळाच्या (S.T. Bus) बसेसना प्रवाशांच्या सुविधेसाठी अटी शर्तींसह परवानगी देण्यात आली आहे.

पर्यटन स्थळांवर थांबण्यास सक्त मनाई; सुरक्षेसाठी पाऊल

पावसाळी निसर्गाचा आनंद घेण्यासाठी रघुवीर घाटात दरवर्षी हजारो पर्यटक गर्दी करतात. मात्र, यंदा उद्भवलेला नैसर्गिक आपत्तीचा धोका टाळण्यासाठी आणि मानवी जीविताच्या सुरक्षेसाठी पर्यटकांना घाटातील मुख्य पर्यटन स्थळांवर थांबण्यास आणि वाहने उभी करण्यास पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. निसर्गाचा आनंद घेताना कोणताही अनपेक्षित अपघात घडू नये, म्हणूनच प्रशासनाने हा कठोर पण अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतला असल्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:10 10-07-2026