संगमेश्वर तालुक्यातील नवीन रस्त्याच्या कडेला पडल्या मोठ्या भेगा; प्रशासनाकडून ठोस उपाययोजनांची प्रतीक्षा
साडवली:
Khadikolwan Road Damage | संगमेश्वर तालुक्यातील खडीकोळवण गावातील नव्याने बांधण्यात आलेल्या रस्त्याचा कडेला मोठ्या प्रमाणात भाग खचल्याची गंभीर बाब समोर आली आहे. यामुळे या मार्गावरील वाहनचालक आणि स्थानिक नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. रस्त्याच्या कडेला पडलेल्या भेगा दिवसांदिवस अधिक रुंदावत चालल्या असून, या ठिकाणी कोणत्याही क्षणी मोठा अपघात होण्याची भीती ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.
मुसळधार पावसामुळे मातीची धूप; वळणावर रस्ता बनला धोकादायक
सध्या सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे या रस्त्याच्या कडील मातीची मोठ्या प्रमाणात धूप होत आहे. माती वाहून गेल्यामुळे रस्त्याचा पाया कमकुवत झाला असून, विशेषतः वळणाच्या ठिकाणी हा रस्ता अत्यंत धोकादायक बनला आहे. या मार्गावरून दुचाकी, चारचाकी तसेच अवजड वाहनांची मोठी वर्दळ असते. त्यातच रस्ता खचल्याने अपघाताची शक्यता अधिक वाढली असून रात्रीच्या वेळी किंवा पावसात हा धोका आणखी गंभीर होत असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे.
सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष; ग्रामस्थांमध्ये नाराजी
खडीकोळवण येथील ग्रामस्थांनी संबंधित सार्वजनिक बांधकाम विभाग व प्रशासनाचे लक्ष अनेक वेळा या समस्येकडे वेधले आहे. मात्र, प्रशासनाकडून अद्याप कोणतीही ठोस उपाययोजना करण्यात आलेली नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांनी या समस्येकडे वेळीच लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे.
संरक्षण भिंत उभारण्याची मागणी; जीवितहानी झाल्यास प्रशासन जबाबदार
ग्रामस्थांनी प्रशासनाकडे तातडीने या रस्त्याची प्रत्यक्ष पाहणी करून खचलेल्या भागाची दुरुस्ती करण्याची मागणी केली आहे. तसेच, रस्त्याला आधार देण्यासाठी तातडीने संरक्षण भिंत उभारणे व आवश्यक सुरक्षाविषयक उपाययोजना करण्याची मागणी लावून धरली आहे. वेळीच दखल घेतली नाही तर मोठी जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा परिस्थितीत उद्भवणाऱ्या कोणत्याही अपघाताची किंवा दुर्घटनेची जबाबदारी संबंधित प्रशासनाची राहील, असा इशाराही ग्रामस्थांनी दिला आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:50 10-07-2026














