प्रशासनाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे अपघाताची भीती
मंडणगड:
‘Palghar Silt Problem’ | मंडणगड तालुक्यातील पालघर परिसरात सध्या वाहतुकीचा आणि पादचाऱ्यांचा मोठा खोळंबा होत आहे. यंदाच्या उन्हाळ्यात पालघर येथे भारजा नदीपात्रातील गाळ काढून नदीपात्र स्वच्छ करण्यात आले होते. मात्र, नदीपात्रातून काढण्यात आलेला हा गाळ सुरक्षित ठिकाणी वाहून नेण्याऐवजी गावाच्या मुख्य रहदारीच्या डांबरी रस्त्याशेजारीच गोळा करून ठेवण्यात आला. आता पावसाळ्याला सुरुवात झाल्यामुळे हा गाळ चिखलाच्या रूपाने थेट मुख्य रस्त्यावर पसरला असून, गावातील अनेक वाड्यांमधील ग्रामस्थ आणि शाळकरी विद्यार्थ्यांना या चिखलातूनच जीवघेणी रहदारी करावी लागत आहे.
नदीकाठच्या मुख्य रस्त्याला चिखलाचा विळखा; सामाजिक कार्यकर्त्यांनी मांडली व्यथा
या गंभीर समस्येच्या संदर्भात स्थानिक सामाजिक कार्यकर्ते इम्रान करदेकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, पालघर येथील अनेक वाड्यांचा मुख्य रस्ता हा भारजा नदीला लागूनच आहे. यंदा नदीपात्रातून गाळ उपसल्यानंतर तो पूर्ण गाळ रस्त्याच्या बाजूला आणि नदीच्या कडेला जमा करून ठेवण्यात आला. तोच गाळ आता सततच्या पावसामुळे वाहून मुख्य रहदारीच्या रस्त्यावर येत आहे, ज्यामुळे लोकांना चालणेही असह्य झाले आहे. हा रस्ता नसून चिखलाचा पट्टा झाला असल्यासारखी स्थिती निर्माण झाली आहे.
लहान मुले, अंगणवाडीचे विद्यार्थी आणि वयोवृद्धांचे हाल; जबाबदार कोण?
याच चिखलमय मुख्य मार्गावरून रोज लहान मुले, अंगणवाडीतील विद्यार्थी, शाळेत जाणारे तरुण आणि वयोवृद्ध नागरिक यांना प्रवास करावा लागत आहे. या ढिसाळ नियोजनाला आणि नागरिकांच्या त्रासाला नक्की जबाबदार कोण, तसेच ग्रामस्थांनी आता दाद मागण्यासाठी कोणाकडे जाब विचारायचा, याकडे कोणीही संबंधित अधिकारी लक्ष देण्यास तयार नाही. संपूर्ण पावसाळा याच चिखलात काढावा लागणार का, आणि यादरम्यान घसरून अपघात होऊन कोणाची जीवितहानी झाली तर त्याला जबाबदार कोणाला धरायचे, असा संतप्त आणि रोकडा प्रश्न इम्रान करदेकर यांनी प्रशासकीय यंत्रणेसमोर उपस्थित केला आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:43 10-07-2026














