Khed Crime News: दापोली-खेड प्रवासात तरुणाला चाकूचा धाक दाखवत लुटले; खेड पोलिसांकडून दोन संशयित ताब्यात

लिफ्ट देण्याच्या बहाण्याने चारचाकीत बसवून जबरदस्तीने ६,२०० रुपये करून घेतले ऑनलाइन ट्रान्सफर; प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण

खेड:

Khed Crime News अंतर्गत कोकणातील प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आणणारी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. दापोलीहून खेडकडे प्रवास करणाऱ्या एका तरुणाला चारचाकी वाहनात लिफ्ट देण्याच्या बहाण्याने बसवून, चाकूचा धाक दाखवून धमकावण्यात आले. एवढेच नव्हे, तर संशयीत आरोपींनी गुगल पे (Google Pay) द्वारे टप्प्याटप्प्याने एकूण ६,२०0 रुपये ऑनलाईन ट्रान्सफर करून जबरदस्तीने लुटल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी खेड पोलीस ठाण्यात तीन अज्ञात व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी तात्काळ कारवाई करत दोन संशयितांना ताब्यात घेतले आहे.

या घटनेबाबत पोलिसांकडून मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, फिर्यादी रोहन राजू तांबे (वय ३० वर्षे) हे फ्रीलान्स न्यूज रिपोर्टर आहेत. ते ८ जुलै रोजी कामानिमित्त दापोली येथे गेले होते. रात्रीच्या वेळी मुसळधार पावसामुळे एसटी बससेवा बंद असल्याने ते खेडला जाण्यासाठी वाहनाची वाट पाहत रस्त्यावर उभे होते. त्याच वेळी तेथून जाणाऱ्या एका चारचाकी वाहनचालकाने त्यांना ‘खेडला सोडू’ असे सांगून विश्वासाने गाडीत बसवले.

पोटावर चाकू लावून जीवे मारण्याची धमकी आणि खोटा व्हिडिओ
गाडी खेडच्या दिशेने जात असताना, कुंभवे परिसरातील नवीन पुलाजवळ वाहनचालकाने अचानक गाडी थांबवली. त्यानंतर आरोपींनी फिर्यादीच्या पोटावर चाकू लावून त्यांना जीवे मारण्याची थेट धमकी दिली. एवढ्यावरच न थांबता आरोपींनी पीडित तरुणाचा एक व्हिडिओ तयार केला आणि त्यात जबरदस्तीने खोटे बोलण्यास भाग पाडले, असा गंभीर आरोप फिर्यादीने आपल्या तक्रारीत केला आहे.

गुगल पे द्वारे टप्प्याटप्प्याने लूट करून कशेडीत सोडले
व्हिडिओच्या माध्यमातून धमकावल्यानंतर आरोपींनी फिर्यादीकडून ऑनलाईन पैशांची मागणी केली. त्यांनी प्रथम २०० रुपये, त्यानंतर १,००० रुपये आणि शेवटी थेट फिर्यादीचा मोबाईल फोन हिसकावून घेत ५,००० रुपये असे एकूण ६,२०० रुपये गुगल पे द्वारे स्वतःच्या खात्यावर ट्रान्सफर करून घेतले. या लूटमारीनंतर आरोपींनी फिर्यादी रोहन तांबे यांना कशेडी घाटाजवळ सोडून दिले आणि तेथून पळ काढला.

या प्रकरणी खेड पोलीस ठाण्यात तीन अज्ञात व्यक्तींविरुद्ध जबरी चोरी, धमकी व इतर संबंधित कायदेशीर कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस पथकासह वेगाने तपासचक्र फिरवत दोन संशयितांना ताब्यात घेतले असून, फरार असलेल्या तिसऱ्या आरोपीचा शोध युद्धपातळीवर सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:13 10-07-2026