Google Parental Control: मुलांच्या मोबाईल गैरवापरावर नियंत्रण ठेवण्यासाठी रत्नागिरीत ‘गूगल पेरेंटल कंट्रोल’ कार्यशाळा; शिर्के प्रशालेत १०० हून अधिक पालकांना तांत्रिक मार्गदर्शन

कीर्तनसंध्या आणि डॉ. अक्षय फाटक यांचा पुढाकार; मुलांचे डिजिटल धोक्यांपासून संरक्षण करण्यासाठी पालकांचे प्रबोधन

रत्नागिरी: Google Parental Control अंतर्गत आजच्या डिजिटल युगात मुलांकडून होणारा मोबाईलचा अतिवापर आणि त्यातून निर्माण होणारे विविध धोके टाळण्यासाठी पालकांनी जागरूक राहणे ही काळाची गरज बनली आहे. या पार्श्वभूमीवर, रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या प्रसिद्ध रा. भा. शिर्के प्रशालेत पालक सभेचे औचित्य साधून ‘गूगल पेरेंटल कंट्रोल’ (Google Parental Control) या अत्यंत महत्त्वाच्या विषयावर एका विशेष कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. ‘कीर्तनसंध्या-रत्नागिरी’ आणि सायबर मार्गदर्शक डॉ. अक्षय फाटक यांच्या संयुक्त विद्यमाने ही कार्यशाळा यशस्वीरित्या पार पडली.

डिजिटल युगात मुलांवर वॉच ठेवण्यासाठी ‘पेरेंटल कंट्रोल’ तंत्रज्ञान

सध्या शाळकरी मुलांमध्ये मोबाईलचे आकर्षण मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. इंटरनेटच्या जगात मुले मोबाईलवर नेमके काय पाहत आहेत, कोणते गेम्स खेळत आहेत आणि काय करत आहेत, यावर पालकांचे बारीक लक्ष असणे आवश्यक आहे. मुलांच्या वर्तनावर, आचारावर आणि विचारांवर योग्य संस्कार व्हावेत, तसेच त्यांना ऑनलाइन फसवणूक, सायबर गुन्हे आणि अश्लील कंटेंटपासून वाचवता यावे, यासाठी मोबाईलमध्ये ‘गूगल पेरेंटल कंट्रोल’ (Google Parental Control) या सुविधेचा प्रभावी वापर कसा करावा, याचे थेट प्रात्यक्षिकांसह सविस्तर व तांत्रिक मार्गदर्शन डॉ. अक्षय फाटक यांनी उपस्थित पालकांना केले.

१०० हून अधिक पालकांची उपस्थिती; शंकांचे निरसन

रा. भा. शिर्के प्रशालेच्या मुख्याध्यापकांच्या संकल्पनेतून आणि सूचनेवरून या महत्त्वपूर्ण मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमाला प्रशालेच्या उपमुख्याध्यापिका सौ. पवार व पर्यवेक्षिका सौ. कांबळे यांचेही मोलाचे सहकार्य लाभले.

या कार्यशाळेत शाळेतील १०० हून अधिक जागरूक पालकांनी सहभाग नोंदवला होता. पालकांनी आपल्या मुलांच्या मोबाईल सवयींविषयी आणि तांत्रिक अडचणींविषयी विचारलेल्या विविध शंकांचे निरसन डॉ. फाटक आणि कीर्तनसंध्या परिवारातर्फे करण्यात आले. पालकांसाठी अत्यंत वेळेवर आणि उपयुक्त ठरलेल्या या उपक्रमाबद्दल शाळेचे मुख्याध्यापक आणि उपस्थित पालकांनी आयोजकांचे मनःपूर्वक आभार मानले.

प्रत्येक शाळेत कार्यशाळा घेण्याचे ‘कीर्तनसंध्या’चे उद्दिष्ट

आजकाल मोबाईलमुळे पालक आणि मुले यांच्यातील थेट संवाद कमी होत चालला आहे. हा संवाद आणि कौटुंबिक नाते अधिक दृढ व्हावे, तसेच मुलांचे भवितव्य सुरक्षित राहावे यासाठी हा उपक्रम रत्नागिरी जिल्ह्यातील प्रत्येक शाळेमध्ये राबविण्याचे उद्दिष्ट ‘कीर्तनसंध्या रत्नागिरी’ संस्थेने ठेवले आहे. या डिजिटल साक्षरता मोहिमेमुळे पालकांना आपल्या मुलांच्या ऑनलाईन ॲक्टिव्हिटीवर घरात बसूनच नियंत्रण ठेवणे सोपे होणार आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
16:39 15-07-2026