१५ मीटर विस्तीर्ण खडकावरील ऐतिहासिक चित्ररचनांची शेलार यांच्याकडून बारकाईने पाहणी, जतनासाठी अधिकाऱ्यांशी चर्चा
Ratnagiri Petroglyphs: रत्नागिरी जिल्ह्यातील चवे देवूड येथील जागतिक महत्त्वाच्या ऐतिहासिक कातळशिल्पांना राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार यांनी भेट देऊन त्यांची सविस्तर पाहणी केली. या जागतिक ठेव्याचे महत्त्व पर्यटकांपर्यंत पोहोचवण्यासाठी देवूड येथे नव्याने सुरू करण्यात आलेल्या विशेष ‘सोव्हीनियर शॉप’चे (स्मृतीवस्तू दुकान) उद्घाटनही त्यांच्या हस्ते आज करण्यात आले.
या महत्त्वपूर्ण पाहणी दौऱ्याप्रसंगी आमदार प्रमोद जठार, आमदार किरण सामंत, प्रशांत यादव यांच्यासह पुरातत्व विभागाचे संचालक तेजस गर्गे, निसर्गयात्री संस्थेचे सुधीर रिसबूड आणि इतर मान्यवर व शासकीय अधिकारी उपस्थित होते. मंत्री शेलार यांनी या सर्व ऐतिहासिक चित्ररचनांची अतिशय बारकाईने पाहणी करत, या दुर्मिळ मानवी वारशाचे जतन आणि संवर्धन करण्याबाबत संबंधित अधिकाऱ्यांशी सविस्तर चर्चा केली.
Ratnagiri Petroglyphs: ६० हून अधिक खोदचित्रांचा विस्तीर्ण समूह
देवूड येथील कातळशिल्पांमध्ये तत्कालीन प्राणी जगताचे अत्यंत वैविध्यपूर्ण, तपशिलवार आणि जिवंत चित्रण पाहावयास मिळते. सुमारे १५ मीटर लांब आणि १२ मीटर रुंद अशा विस्तीर्ण खडकावर पसरलेल्या या चित्र समूहामध्ये साठपेक्षा अधिक प्राचीन खोद चित्ररचना आहेत. या कातळशिल्पांमध्ये मानवी विकासाचा ऐतिहासिक ठेवा दडलेला असून, प्राचीन मानवाच्या अद्भूत कलाकुसरीची वैशिष्ट्ये येथे आढळून येतात.
या चित्रसमूहात प्रामुख्याने खालील वैशिष्ट्ये आढळतात:
- आक्रमक पावित्र्यातील एकशिंगी गेंडा आणि झेप घेणारे हरीण.
- मार्जार कुळातील कांडेचोर सदृश रचना आणि लांब पिसारा असलेला मोर.
- शरीरावरील केस उभे असलेला तरस आणि लांब व शरीराच्या वरती उचललेल्या शेपटीसह माकड.
- मानवी पावलांसदृश्य चित्ररचना आणि प्राण्यांच्या शिंगासारख्या विविध आकृत्या.
- काही वैशिष्ट्यपूर्ण अमूर्त चित्ररचना.
पर्यावरण आणि मानव विज्ञानाच्या दृष्टीने जागतिक महत्त्व
येथील कातळशिल्पे केवळ पुरातत्वीय दृष्टिकोनातूनच नव्हे, तर कलात्मक, पर्यावरणीय व मानव विज्ञानाच्या दृष्टीनेही अत्यंत महत्त्वाची मानली जातात. ही ऐतिहासिक खोदचित्रे मानवी विकासाच्या सुरुवातीच्या टप्प्यातील जीवनशैली, प्राचीन मानवाची अद्भूत निरीक्षणक्षमता आणि त्यांचे तत्कालीन पर्यावरणाशी असलेले घट्ट नाते यांची प्रकर्षाने साक्ष देतात. या ऐतिहासिक वारशाचे महत्त्व जागतिक स्तरावर अधोरेखित होत असल्याने त्याच्या जतनाला प्राधान्य दिले जात आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:40 17-07-2026














