Dapoli Fish Market: दापोलीत मुख्य रहदारीच्या रस्त्यावरच मासळी बाजार; तीव्र दुर्गंधीमुळे नागरिक अन् पर्यटक त्रस्त

नगरपंचायतीने पर्यायी जागा देऊनही मुख्य मार्गावरच विक्रेत्यांचे ठाण; तातडीने कारवाई करण्याची नागरिकांची मागणी

Dapoli Fish Market: दापोली शहरातील मंडणगड-दापोली मुख्य मार्गावर, एसटी बस स्थानकाजवळील रहदारीच्या रस्त्यावरच मासळी विक्रेत्यांनी मोठ्या प्रमाणावर ठाण मांडल्याचे चित्र समोर आले आहे. मुख्य रस्त्यावरच विक्रेते बसत असल्यामुळे या भागात सध्या एक अनधिकृत मासळी बाजार तयार झाला असून यामुळे दिवसभर परिसरात मासळीची तीव्र दुर्गंधी पसरत आहे. या बिकट परिस्थितीमुळे स्थानिक नागरिक, व्यापारी आणि दापोलीत येणाऱ्या पर्यटकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे.

वास्तविक पाहता, मासळी विक्रीसाठी दापोली नगरपंचायतीच्या वतीने स्वतंत्र आणि हक्काच्या पर्यायी जागेची व्यवस्था उपलब्ध करून देण्यात आली आहे. असे असतानाही, अनेक विक्रेते या अधिकृत जागेऐवजी मुख्य रहदारीच्या रस्त्यावरच बेकायदेशीरपणे मासळी विक्री करत आहेत. यामुळे दापोलीतील अंतर्गत वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण होत असून पादचाऱ्यांनाही चालताना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे.

Dapoli Fish Market: पावसाळ्यात अस्वच्छतेत प्रचंड वाढ

सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने या समस्येने अधिकच गंभीर रूप धारण केले आहे. रस्त्यावर साचणारे सांडपाणी आणि त्यातच टाकण्यात येणार मासळीचा कचरा यामुळे परिसरातील अस्वच्छतेत कमालीची भर पडली आहे. यामुळे निर्माण होणारी दुर्गंधी दिवसेंदिवस अधिक तीव्र होत असल्यामुळे स्थानिक रहिवाशांचे आरोग्य धोक्यात आल्याची तक्रार केली जात आहे.

पर्यटन स्थळ म्हणून प्रसिद्ध असलेल्या दापोली शहरात दररोज शेकडो पर्यटक येत असतात. मात्र, बस स्थानकाजवळील या अस्वच्छ वातावरणामुळे शहरात येणाऱ्या पर्यटकांवर अत्यंत विपरीत परिणाम होत आहे. परिणामी, दापोली शहराच्या स्वच्छ आणि पर्यटनपूरक प्रतिमेला मोठा धक्का बसत आहे.

नगरपंचायतीकडे तातडीच्या कारवाईची मागणी

या वाढत्या त्रासाला कंटाळलेले स्थानिक व्यावसायिक आणि नागरिक आता आक्रमक झाले आहेत. नगरपंचायत प्रशासनाने या गंभीर समस्येकडे त्वरित लक्ष देऊन तातडीने कडक कारवाई करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे. मुख्य रस्त्यावरील ही अनधिकृत मासळी विक्री पूर्णपणे बंद करून सर्व विक्रेत्यांना नगरपंचायतीने ठरवून दिलेल्या पर्यायी मासळी बाजारात तातडीने स्थलांतरित करावे, अशी आग्रही मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:34 17-07-2026