केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी कायम; सोनम वांगचुक यांच्या उपोषणाचा संदर्भ देत रोहित पवार यांनी व्यक्त केली चिंता
नवी दिल्ली : नीट परीक्षा गैरप्रकारावरून देशभरातील तरुणांमध्ये तीव्र असंतोष पाहायला मिळत आहे. या प्रकरणी दिल्लीतील जंतर-मंतर येथे कॉक्रोच जनता पक्षाच्या वतीने सुरू असलेल्या आंदोलनाला एक महिना पूर्ण झाला आहे. आंदोलनाचे नेतृत्व अभिजीत दीपके करत असून, महिनाभरानंतरही आंदोलनकर्ते केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर ठाम आहेत. या आंदोलनाला सर्वच स्तरातून पाठिंबा मिळत असून, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी मध्यरात्री जंतर-मंतरला भेट देऊन आंदोलकांची भेट घेतली आणि पाठिंबा जाहीर केला.
जंतर-मंतरवर रात्री उशिरापर्यंत गर्दी; ‘हे तरुण पिढीचे आंदोलन’
आमदार रोहित पवार यांनी मध्यरात्री दिल्लीत माध्यमांशी संवाद साधताना सरकारवर जोरदार निशाणा साधला. ते म्हणाले, “आज या जंतर-मंतरमधील आंदोलनात फक्त तरुण युवक सामील झाले नाहीत, तर सर्व वयोगटातील नागरिक सहभागी झाले आहेत. मी जवळपास ५ किलोमीटरचा संपूर्ण परिसर फिरून पाहिला आहे. मध्यरात्रीचे १२ वाजले तरी आंदोलकांची गर्दी वाढतच आहे. या तरुणांची आता एकच मागणी आहे की, केंद्रीय शिक्षणमंत्र्यांनी राजीनामा द्यावा. हे आंदोलन कोणत्याही एका राजकीय व्यक्तीचे नसून पुढच्या पिढीचे म्हणजेच तरुणांचे आंदोलन आहे, म्हणूनच आम्ही याला पूर्ण पाठिंबा देत आहोत.”
सोनम वांगचुक यांच्या उपोषणाचा संदर्भ अन् आंदोलकांना सतर्कतेचा सल्ला
आंदोलनाला संबोधित करताना रोहित पवार यांनी सोनम वांगचुक यांच्या उपोषणाचा दाखला दिला. “सोनम वांगचुक यांनी उपोषण सोडले, पण त्यांनी सोबतच्या लोकांना घेऊन ते सोडायला हवे होते. आपल्याला बळजबरीने उपोषण सोडण्यास भाग पाडले गेले आणि कौटुंबिक त्रास दिला गेला, असा दावा वांगचुक यांनी केला आहे. जर सरकार आंदोलन दडपण्यासाठी अशा पद्धती वापरत असेल, तर त्यांच्यावर भरवसा कसा ठेवायचा?” असा सवाल रोहित पवार यांनी उपस्थित केला.
यासोबतच, या आंदोलनाविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली असून आंदोलन उठवण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो, असा दावा करत सर्व आंदोलकांनी सतर्क राहण्याची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
मुंबईतील २६ तारखेच्या आंदोलनाला पाठिंबा; पोलिसांच्या भूमिकेवर टीका
मुंबईत येत्या २६ तारखेला होणाऱ्या आंदोलनालाही आपल्या पक्षाचा पूर्ण पाठिंबा असल्याचे रोहित पवार यांनी सांगितले. आंदोलनादरम्यान पोलिसांकडून मिळणाऱ्या वागणुकीवर टीका करताना ते म्हणाले, “पोलिसांकडून आंदोलकांना, विशेषतः महिला व तरुणींना मिळणारी वागणूक अत्यंत चुकीची आहे. या अन्यायाविरोधात आम्ही सातत्याने आवाज उठवत राहू. आम्ही यापूर्वीही अनेक आंदोलने केली आहेत आणि त्या माध्यमातून सरकारला निर्णय घेण्यास भाग पाडले आहे.”
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:27 25-07-2026














