आषाढी एकादशीची महापूजा आटोपून मुख्यमंत्री दिल्लीकडे रवाना; ठाकरे बंधूंच्या ‘तिरंगा मार्च’आधी फडणवीस यांची दिल्लीवारी महत्त्वाची
Devendra Fadnavis: दिल्लीतील जंतर-मंतरवर कॉक्रोच जनता पार्टी आणि विद्यार्थ्यांच्या तीव्र आंदोलनानंतर केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान (Dharmendra Pradhan) यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. या मोठ्या राजकीय घडामोडीनंतर महाराष्ट्राच्या राजकारणातही वेगाने सूत्रे हलली असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तातडीने दिल्लीला रवाना झाले आहेत. केंद्रीय नेतृत्वाने फडणवीस यांना अचानक दिल्लीत बोलावून घेतल्याने राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले आहे.
Devendra Fadnavis: पंढरपुरातील महापुजेनंतर तातडीने दिल्ली दौरा
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी पहाटे आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूर येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात पत्नी अमृता फडणवीस यांच्यासमवेत शासकीय महापूजा संपन्न केली. महापूजा पार पडल्यानंतर दुपारी १ च्या सुमारास ते सोलापुरातून थेट दिल्लीकडे रवाना झाले आणि काही वेळापूर्वीच दिल्लीत पोहोचले आहेत.
धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर केंद्रीय नेतृत्वाने फडणवीस यांना इतक्या तातडीने का बोलावले, याचे अधिकृत कारण अद्याप समोर आलेले नाही. मात्र, रविवारी मुंबईत NEET पेपरफुटीच्या मुद्द्यावर ठाकरे बंधूंकडून ‘तिरंगा मार्च’ची हाक देण्यात आली आहे. या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस यांची ही दिल्लीवारी अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे.
“मला महाराष्ट्रातच राहायचंय!” — अमृता फडणवीस
दरम्यान, देवेंद्र फडणवीस केंद्रीय मंत्रिमंडळात जाणार आणि दिल्लीत जबाबदारी सांभाळणार, अशा चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू होत्या. यावर पंढरपूर येथे प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी स्पष्ट भूमिका मांडली. “नाही, आम्हाला आणि मला महाराष्ट्रातच राहायचं आहे. मी देवेंद्रजींना महाराष्ट्रातच ठेवणार,” असे दोन वाक्यांत उत्तर देत त्यांनी या चर्चांवर भाष्य केले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
15:28 25-07-2026














