Sanjay Raut: “देवेंद्र फडणवीस देशाचे नवे शिक्षणमंत्री?”; धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर संजय राऊत यांचा मोठा दावा

दिल्लीतील राजकीय घडामोडींनंतर राऊतांची रोखठोक प्रतिक्रिया; मुख्यमंत्री फडणवीस यांच्या दिल्लीवारीवर साधला निशाणा

Sanjay Raut: नीट पेपरफुटी प्रकरणावरून (NEET Paper Leak) तीव्र आंदोलनानंतर केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. या घडामोडींनंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तातडीने दिल्लीला रवाना झाले असून, त्यावर ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी अत्यंत रोखठोक आणि खळबळजनक दावा केला आहे.

Sanjay Raut: “केंद्रात फडणवीस यांच्याकडे शिक्षणमंत्रिपद जाण्याची शक्यता”

धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर रिक्त झालेल्या जागी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची नियुक्ती केली जाऊ शकते, असा दावा संजय राऊत यांनी केला.

पत्रकारांशी बोलताना राऊत म्हणाले, “फडणवीस हे उच्चशिक्षित आणि वकील आहेत. ते विविध विषयांवर अभ्यासपूर्ण मांडणी करत असतात. त्यांना केंद्र सरकारमध्ये नेण्याबाबत दिल्लीत सातत्याने चर्चा सुरू असते. त्यामुळे आता योगायोगाने किंवा त्यांच्या दुर्दैवाने, देशाचे नवे शिक्षणमंत्री म्हणून त्यांना ही मोठी जबाबदारी मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही.” तसेच, विद्यार्थ्यांच्या आक्रोशाचा फटका स्वतःला बसू नये म्हणूनच पंतप्रधान मोदींनी प्रधान यांचा राजीनामा घेतल्याचा आरोपही त्यांनी केला.

सत्ताधाऱ्यांवर कडाडून टीका

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दिल्ली दौऱ्यावर भाष्य करताना राऊत यांनी सत्ताधाऱ्यांवर शेलक्या शब्दांत टीका केली. “एकनाथ शिंदे, सुनेत्रा पवार आणि देवेंद्र फडणवीस यांचे ‘निझाम’ दिल्लीत बसले आहेत. त्यामुळे त्यांच्या आदेशांचे पालन करण्यासाठी या लोकांना दिल्लीची वारी करावीच लागते,” असा घणाघाती आरोप त्यांनी केला.

“तरुणांनी मृतप्राय लोकशाहीला जीवदान दिले”

दिल्लीतील जंतर-मंतरवरील आंदोलनाचे कौतुक करताना संजय राऊत म्हणाले की, गेल्या १२ वर्षांनंतर देशात असे एक ऐतिहासिक आंदोलन उभे राहिले, ज्याच्या दबावामुळे मोदी सरकारमधील पहिल्या मंत्र्याला राजीनामा द्यावा लागला. लाठीचार्ज आणि दडपशाही सहन करून आजच्या ‘Gen Z’ तरुणांनी देशातील मृतप्राय झालेल्या लोकशाहीला नवीन जीवदान दिले आहे.

ठाकरे बंधूंचा मोर्चा होणारच; शिवतीर्थावर जमणार

दरम्यान, रविवारी मुंबईत होणाऱ्या ठाकरे बंधूंच्या संयुक्त मोर्चाबाबत बोलताना त्यांनी स्पष्ट केले की, केंद्र सरकारने शिक्षणमंत्र्यांचा राजीनामा घेतला असला तरी आमच्या नियोजित कार्यक्रमात कोणताही बदल झालेला नाही. सर्व कार्यकर्ते आणि नागरिक शिवतीर्थावर जमणार असून, या मोर्चाचे स्वरूप कसे असेल याची माहिती लवकरच दिली जाईल.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
16:34 25-07-2026