उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची संयुक्त पत्रकार परिषद, आंदोलक तरुणांचे मानले आभार
NEET Paper Leak: नीट पेपरफुटी प्रकरणावरून देशात पेटलेल्या तीव्र आंदोलनानंतर केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी अखेर आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. या मोठ्या राजकीय घडामोडीनंतर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची संयुक्त पत्रकार परिषद पार पडली. या वेळी बोलताना उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आणि “एका झुरळाने या सरकारला झुकवले,” असे विधान केले.
NEET Paper Leak: “तरुणांनी देशाला भयाच्या छायेतून बाहेर काढले”
पत्रकार परिषदेत बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, “गेले काही दिवस आपला देश अस्वस्थ आहे. नीट पेपरफुटीमुळे तरुण हवालदील झाले होते. मी पहिल्यांदा अभिजीत दीपके आणि देशातील सर्व तरुणांचे मनापासून कौतुक करतो. तसेच न घाबरता या तरुणांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणाऱ्या पालकांचेही अभिनंदन करतो. या देशातील तरुणांनी नागरिकांना भयाच्या छायेतून बाहेर काढले आहे.”
सरकारवर निशाणा साधताना ते पुढे म्हणाले, “काही ना काही दबाव देशातील जनतेवर सातत्याने टाकला जात होता. जणू काही या देशात माणसे शिल्लक राहिलेली नाहीत, फक्त झुरळे आहेत अशा प्रकारे लोकांना वागवले जात होते. ‘एक मच्छर साला…’ हा संवाद तुम्हाला आठवत असेल, पण आज एका झुरळाने (कॉक्रोच जनता पार्टी) या सरकारला झुकवून दाखवले आहे.”
“जॅमर लागल्यामुळे अभिजीतशी संपर्क नाही; पुढच्या आंदोलनाची दिशा ठरवणार”
उद्धव ठाकरे यांनी पुढे सांगितले की, “मी पुढच्या आंदोलनाची दिशा काय असेल हे अभिजीतला सांगणार आहे. मी त्याला फोन लावण्याचा प्रयत्न करतोय, पण तिथे जॅमर बसवल्यामुळे संपर्क होत नाहीये.”
रविवारी मुंबईत नियोजित मोर्चा होणारच; उद्धव ठाकरेंची मोठी अपडेट
धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिल्याने रविवारी मुंबईत मनसे आणि शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने निघणारा संयुक्त मोर्चा होणार की रद्द होणार, याबाबत चर्चा सुरू होती. यावर स्पष्टीकरण देताना उद्धव ठाकरे म्हणाले की, “शिक्षणमंत्र्यांचा राजीनामा झाला असला तरी उद्याचा आमचा मोर्चा निश्चितपणे होणार आहे.” या मोर्चाच्या माध्यमातून परीक्षा व्यवस्थेतील पुढील सुधारणा आणि विद्यार्थ्यांच्या मागण्यांवर भर दिला जाणार असल्याचे संकेत त्यांनी दिले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
17:10 25-07-2026














