MPSC Paper Leak? नीट प्रकरणापाठोपाठ एमपीएससीच्या औषध निरीक्षक भरतीत गैरप्रकाराचा संशय; चौकशीची मागणीएमपीएससी

परीक्षेपूर्वी व्हॉट्सॲपवर प्रश्नपत्रिका व्हायरल झाल्याचा उमेदवारांचा गंभीर आरोप

पुणे:

देशभरात गाजलेल्या नीट (NEET) पेपरफुटी प्रकरणानंतर आता महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (MPSC) घेण्यात आलेल्या औषध निरीक्षक (Drug Inspector) भरती प्रक्रियेवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. या भरती प्रक्रियेत मोठा गैरप्रकार झाल्याचा आरोप करत दोन परीक्षार्थी उमेदवारांनी थेट पुराव्यांसह महाराष्ट्र लोकसेवा आयोग आणि अन्न व औषध प्रशासनाकडे (FDA) लेखी तक्रार नोंदवली आहे.

व्हॉट्सॲप चॅट आणि डिजिटल पुराव्यांची फॉरेन्सिक तपासणी करण्याची मागणी

तक्रारदार उमेदवारांनी दिलेल्या माहितीनुसार, २२ मार्च २०२६ रोजी पार पडलेल्या औषध निरीक्षक भरती परीक्षेपूर्वी काही प्रश्न आणि त्यांची उत्तरे व्हॉट्सॲपवर (WhatsApp) व्हायरल झाली होती. याशिवाय काही विशिष्ट उमेदवारांचे गुण संशयास्पदरीत्या वाढल्याचा आरोपही तक्रारदारांनी केला आहे.

मिळालेल्या गुणपत्रिका आणि अंतिम निवड या दोन्हीमध्ये मोठी विसंगती असल्याचा दावा त्यांनी केला आहे. त्यामुळे या प्रकरणात समोर आलेले व्हॉट्सॲप चॅट्स, कॉल रेकॉर्ड्स आणि इतर सर्व डिजिटल पुराव्यांची तात्काळ फॉरेन्सिक (Forensic) तपासणी करावी, तसेच या प्रकरणाची स्वतंत्र चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.

एमपीएससीचे स्पष्टीकरण; पडताळणी करून कारवाईचे आश्वासन

या गंभीर आरोपांनंतर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (MPSC) आपली अधिकृत भूमिका स्पष्ट केली आहे. औषध निरीक्षक पदाची भरती प्रक्रिया अद्याप पूर्ण झालेली नाही, असे आयोगाकडून सांगण्यात आले. प्राप्त झालेल्या तक्रारींमधील तथ्यांची योग्य ती पडताळणी केली जाईल आणि त्यानुसार पुढील आवश्यक ती कायदेशीर व प्रशासकीय कार्यवाही केली जाईल, अशी माहिती एमपीएससी प्रशासनाने दिली आहे.

हजारो विद्यार्थ्यांच्या भविष्याचा प्रश्न; महेबुब शेख आक्रमक

या प्रकरणावर राजकीय आणि सामाजिक वर्तुळातून तीव्र प्रतिक्रिया येत आहेत. राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष महेबुब शेख यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर (X) पोस्ट करत सरकार आणि आयोगावर टीका केली आहे. “MPSC औषध निरीक्षक परीक्षा हा केवळ एका पेपरचा प्रश्न नसून हजारो विद्यार्थ्यांच्या भविष्याचा प्रश्न आहे. परीक्षेपूर्वी उमेदवारांकडे प्रश्नपत्रिका उपलब्ध असणे हा संपूर्ण परीक्षा व्यवस्थेवरील विश्वासाला हादरा देणारा प्रकार आहे,” असे शेख यांनी म्हटले आहे.

प्रामाणिक विद्यार्थ्यांच्या अनेक वर्षांची मेहनत आणि पालकांचे कष्ट पणाला लागले असून, परीक्षा प्रक्रिया अत्यंत पारदर्शक व्हावी आणि विद्यार्थ्यांना न्याय मिळावा यासाठी हा लढा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:42 27-07-2026