MPSC Paper Leak प्रकरणावर पत्रकार परिषद: १०० पैकी ९० प्रश्न व्हॉट्सॲपवर लीक; फॉरेन्सिक ऑडिटची रोहित पवारांची मागणी
पुणे:
महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (MPSC) घेण्यात आलेल्या औषध निरीक्षक (Drug Inspector) भरती प्रक्रियेतील कथित गैरप्रकारावरून राजकीय वातावरण तापले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन MPSC Paper Leak प्रकरणात थेट पुराव्यांसह खळबळजनक गौप्यस्फोट केला आहे. २२ मार्च २०२६ रोजी पार पडलेल्या या परीक्षेचा मुख्य पेपर तब्बल दोन दिवस आधीच फुटल्याचा गंभीर आरोप पवार यांनी केला आहे.
नंदुरबार ते बार्शी कनेक्शन; १०० पैकी ९० प्रश्न आधीच मिळालेले?
पत्रकार परिषदेत प्रेझेंटेशन सादर करत रोहित पवार यांनी पेपरफुटीचे संपूर्ण रॅकेट उघड करण्याचा प्रयत्न केला. नंदुरबार येथील एका अकॅडमीतील विद्यार्थ्याला २० मार्च रोजीच म्हणजेच परीक्षेच्या दोन दिवस आधी व्हॉट्सॲपवर प्रश्नपत्रिका मिळाली होती, असा दावा त्यांनी केला.
दोन ते तीन मिनिटांत व्हॉट्सॲपवरून मेसेज ‘डिलिट फॉर ऑल’ केले जायचे. मात्र, एका विद्यार्थ्याने ते डाऊनलोड करून मित्राला पाठवल्यामुळे याचे थेट पुरावे उपलब्ध झाल्याचे पवार म्हणाले. १०० पैकी तब्बल ९० प्रश्न आधीच लीक झाले होते.
याशिवाय या प्रकरणात ‘बार्शी कनेक्शन’ उघड झाले असून एका नायब तहसीलदाराच्या मुलाला १३ वा तर मुलीला १६ वा रँक मिळाल्याकडे त्यांनी लक्ष वेधले. नीट (NEET) परीक्षेप्रमाणेच येथेही पेपर सेट करणारी मूळ व्यक्तीच फुटल्याचा संशय व्यक्त करत यामागील मुख्य सूत्रधार (आका) कोण आहे, असा थेट सवाल पवार यांनी केला.
“पैसे देऊन आलेला अधिकारी प्रामाणिक काम करेल का?”
रोहित पवार यांनी या वेळी औषध निरीक्षक पदाचे महत्त्व विशद करताना आरोग्य यंत्रणेच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. “पैसे देऊन औषध निरीक्षक बनलेला अधिकारी पुढे जाऊन प्रामाणिक काम करेल का? तो आधी दिलेले पैसे वसूल करण्याचे टार्गेट ठेवेल. कफ सिरपसारख्या औषधांच्या गुणवत्तेची तपासणी करण्याची जबाबदारी याच अधिकाऱ्यांवर असते. त्यामुळे अशा भ्रष्ट भरतीमुळे थेट जनतेच्या जिवाशी खेळ सुरू आहे,” अशी आक्रमक भूमिका त्यांनी मांडली.
तक्रारदार विद्यार्थ्यांना धमक्या; फॉरेन्सिक तपासणीची मागणी
काही प्रामाणिक विद्यार्थ्यांनी या सर्व प्रकाराबाबत आयोगाकडे तक्रार केली होती; मात्र आयोगाकडून कोणतेही सकारात्मक उत्तर मिळाले नाही, उलट विद्यार्थ्यांना पोलीस कारवाईच्या धमक्या दिल्या जात असल्याचा गंभीर आरोप रोहित पवार यांनी केला.
या प्रकरणात अधिकारी तुकाराम मुंडे यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असला, तरी त्यांच्या अधिकारात मर्यादा आहेत. त्यामुळे संबंधित अकॅडमीचे तात्काळ फॉरेन्सिक ऑडिट करून कॉल रेकॉर्ड्स आणि डिलीट केलेले व्हॉट्सॲप चॅट्स परत मिळवून (Retrieve) दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी जोरदार मागणी पवार यांनी शेवटी केली.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:58 27-07-2026














