लांजा : तळवडे येथे बिबट्याच्या हल्ल्यात गायीचा मृत्यू

लांजा : लांजा तालुक्यातील तळवडे येथे माळरानावर चरण्यासाठी गेलेल्या गुरांच्या कळपावर बिबट्याच्या हल्ल्यात एक गाय ठार झाल्याची घटना घडली. ही घटना बुधवारी सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास घडली. दरम्यान, दिवसाढवळ्या बिबट्याच्या दहशतीमुळे तळवडे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.

बिबट्याने गुरांच्या कळपावर केलेल्या या हल्ल्यात एक गाय मृत्युमुखी पडली असून, एक गाय गंभीर जखमी झाली आहे. तळवडे येथील शेतकरी रुपेश प्रकाश पाटोळे व सुशांत दत्ताराम पाटोळे या शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे.

याबाबत शेतकऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार शेतकरी रुपेश पाटोळे यांनी नेहमीप्रमाणे सकाळी ७.३० च्या सुमारास तळवडे मळाबांध येथील माळराणावर गुरे चरण्यासाठी सोडली होती. गुरे चरत असताना बुधवारी सकाळी ९च्या सुमारास बाजूच्या झुडपांमध्ये दबा धरुन बसलेल्या बिबट्याने गुरांवर हल्ला केला. बिबट्याच्या या हल्ल्यामध्ये रुपेश पाटोळे यांची गाय ठार झाली तर सुशांत पाटोळे या शेतकऱ्याची एक गाय गंभीर जखमी आहे. हल्ल्यानंतर गुरांच्या ओरडण्याचा आवाज आल्याने शेतकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली असता त्यांना कळपातील गुरे सैरावैरा पळताना दिसली. यावेळी हल्लेखोर बिबट्या बाजूच्या जंगलात पळून जाताना ग्रामस्थांनी पाहिले. दरम्यान, तळवडे गावात बिबट्याचा वावर सुरू झाल्याने वन विभागाने या ठिकाणी पिंजरा लावण्यात यावा, अशी मागणी तळवडे ग्रामपंचायतीचे सदस्य मुन्ना पाटोळे यांनी केली आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
04:39 PM 07/Nov/2024