सुट्टीत मुलांसाठी खास ‘वाचन कट्टा’! रत्नागिरी नगर वाचनालयाचा अनोखा उपक्रम; पुस्तके वाचा, लिहा आणि बक्षिसे जिंका

रत्नागिरी : शाळांना उन्हाळी सुट्ट्या सुरू झाल्या असून, बालगोपाळ या सुट्टीचा मनमुराद आनंद लुटत आहेत. मोबाईल आणि टीव्हीच्या युगात मुलांच्या या आनंदात भर घालण्यासाठी आणि त्यांच्यात वाचनाची आवड निर्माण करण्यासाठी रत्नागिरी (जिल्हा) नगर वाचनालयाने एक स्तुत्य पाऊल उचलले आहे. सुट्टीच्या काळात बालगोपाळांसाठी वाचनालयाच्या वतीने ‘पुस्तक खजिना’ उपलब्ध करून दिला जाणार असून, नोंदवही स्पर्धेच्या माध्यमातून मुलांना बक्षिसे जिंकण्याची सुवर्णसंधीही मिळणार आहे.

सोसायट्या आणि वाड्या-वस्त्यांवर ‘ग्रंथमित्र ग्रुप’

रत्नागिरी शहरातील विविध हौसिंग सोसायट्या, वाड्या आणि वस्त्यांवरील मुलांची संख्या लक्षात घेऊन त्या-त्या ठिकाणी मुलांचे ‘ग्रंथमित्र ग्रुप’ तयार करण्यात येणार आहेत. या ग्रुपची वाचनालयात रीतसर नोंद केल्यावर, त्या ग्रुपला बाल वाचन साहित्य आणि पुस्तके उपलब्ध करून देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय वाचनालयाने घेतला आहे. हा विशेष उपक्रम १० मे २०२६ ते १० जून २०२६ या महिनाभराच्या कालावधीत बालवाचकांसाठी सुरू राहील.

पुस्तके वाचा, नोंद करा आणि जिंका बक्षीस!

ग्रंथालयात नोंदणी करणाऱ्या ग्रंथमित्र ग्रुपला मुलांच्या संख्येनुसार गोष्टींची पुस्तके दिली जातील. एक संच वाचून पूर्ण झाल्यावर तो बदलून दुसरी पुस्तके दिली जातील. मुलांनी एकत्र बसून वाचनाचा आनंद लुटावा किंवा शक्य नसल्यास पुस्तके घरी नेऊन वाचावीत. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, पुस्तक वाचून झाल्यावर ‘त्यात काय वाचले?’ याची नोंद एका स्वतंत्र वहीत करणे आवश्यक आहे. उपक्रमाची मुदत संपल्यावर या वह्या वाचनालयाकडे जमा करायच्या आहेत. या नोंदवहीतील नोंदींचा आढावा घेऊन उत्कृष्ट वाचक मुलांना बक्षिसे जाहीर केली जातील. मात्र, या नोंदी मुलांनी स्वतःच्या हस्ताक्षरात लिहिलेल्या असणे बंधनकारक आहे.

हॅरी पॉटर, फास्टर फेणे ते AI… बालसाहित्याचा खजिना

वाचनालयामध्ये मुलांच्या आवडीचे भरपूर बालसाहित्य उपलब्ध आहे. यामध्ये ‘हॅरी पॉटर’, ‘फास्टर फेणे’, ‘फेमस फाईव्ह’ यांसारख्या प्रसिद्ध मराठी आणि इंग्रजी पुस्तक सिरीजचा समावेश आहे. तसेच थोर व्यक्ती आणि समाजसुधारकांचा परिचय करून देणारी पुस्तके, चातुर्यकथा, युद्ध कथा आणि साहसकथाही उपलब्ध आहेत. याशिवाय, विज्ञानाची आणि तंत्रज्ञानाची जिज्ञासा वाढवणारी ‘१६९५ स्मार्ट रोबो-ए आय’ आणि ‘औरंगजेब’ यांसारखी आधुनिक विषयांवरील पुस्तकेही बालवाचकांची वाट पाहत आहेत.

वाचनालयातही मोफत वाचनाची उत्तम सोय

सोसायट्यांमधील उपक्रमासोबतच, वाचनालयाच्या आसपास राहणाऱ्या मुलांसाठी थेट ग्रंथालयात येऊन वाचण्याची मोफत सोय करण्यात आली आहे. सकाळी ९.३० ते १२.०० आणि दुपारी ४.०० ते ६.०० या वेळेत मुलांसाठी मोफत वाचनालय सुरू राहील. येथे मुलांना प्रशस्त जागी बसून वाचन करता येईल. ही मुलेदेखील वरील नोंदवही स्पर्धेत सहभागी होऊ शकतील.

या उन्हाळी सुट्टीत जास्तीत जास्त मुलांनी वाचनालयात येऊन आपल्या आवडीची पुस्तके मनसोक्त वाचावीत आणि त्यातून व्यक्त व्हावे, असे आवाहन रत्नागिरी नगर वाचनालयाचे अध्यक्ष ॲड. दीपक पटवर्धन यांनी केले आहे.