गुहागर बाजारपेठेतील रस्ता पावसाळ्यापूर्वी दुरुस्त करा, अन्यथा तीव्र आंदोलन; ठाकरे शिवसेनेचा सार्वजनिक बांधकाम विभागाला इशारा

गुहागर: रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर शहरातील मुख्य बाजारपेठेतून जाणाऱ्या गुहागर-वेळदूर मुख्य रस्त्याची सध्या प्रचंड दुरवस्था झाली आहे. अनेक वेळा पत्रव्यवहार करूनही सार्वजनिक बांधकाम उपविभागाने अद्याप कोणतीही ठोस कारवाई केलेली नाही. त्यामुळे संतप्त झालेल्या शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या गुहागर शहर पदाधिकाऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेतला असून, पावसाळ्यापूर्वी हा रस्ता दुरुस्त न झाल्यास ‘शिवसेना स्टाईल’ने तीव्र आंदोलन छेडण्याचा स्पष्ट इशारा दिला आहे.


केवळ डागडुजीमुळे समस्या जशीच्या तशी; अपघातांचा धोका वाढला

गुहागर-वेळदूर हा रस्ता सार्वजनिक बांधकाम उपविभागाच्या अखत्यारीत येतो. हा रस्ता थेट मुख्य बाजारपेठेतून आणि वर्दळीच्या वस्तीतून जात असल्याने स्थानिक व्यापारी, नागरिक आणि पर्यटकांना याचा प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. रस्त्यावर पडलेल्या मोठ्या खड्ड्यांमुळे परिसरात लहान-मोठे अपघात घडून नागरिकांचा जीव धोक्यात आला आहे.

यापूर्वी बांधकाम विभागाकडून केवळ थातूरमातूर डागडुजी केली जात होती, जी ३-४ दिवसांत पुन्हा जैसे थे होते. आता पावसाळा तोंडावर आला असतानाही रस्त्याच्या कायमस्वरूपी दुरुस्तीचे कोणतेही ठोस नियोजन बांधकाम विभागाने केलेले नाही.


शिवसेना पदाधिकाऱ्यांचा बांधकाम उपविभाग कार्यालयावर धडक मोर्चा

या गंभीर समस्येची दखल घेत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या गुहागर शहर पदाधिकाऱ्यांनी सार्वजनिक बांधकाम उपविभाग, गुहागर कार्यालयावर धडक दिली. यावेळी उपस्थित वरिष्ठ अधिकाऱ्यांशी दूरध्वनीवरून थेट संपर्क साधण्यात आला आणि बाजारपेठेतील रस्त्याचे काम पावसाळ्यापूर्वी तातडीने पूर्ण करण्याची मागणी लावून धरण्यात आली.


‘पावसाळ्यापूर्वी काम करा, अन्यथा गाठ आमच्याशी’

बांधकाम विभागाच्या ढिसाळ कारभारावर तीव्र नाराजी व्यक्त करत, जर पावसाळा सुरू होण्यापूर्वी रस्त्याचे काम पूर्ण झाले नाही, तर होणाऱ्या आंदोलनाला प्रशासन जबाबदार राहील, असे पदाधिकाऱ्यांनी ठणकावून सांगितले.

यावेळी आंदोलनात प्रामुख्याने खालील पदाधिकारी उपस्थित होते:

  • सिद्धिविनायक जाधव (शहरप्रमुख)
  • राज विखारे (युवा सेना शहरप्रमुख)
  • पराग मालप (विभागप्रमुख)
  • प्रभुनाथ देवळेकर (शाखाप्रमुख)
  • कल्पेश बागकर (पदाधिकारी)
  • आर्य पाटील (युवा सैनिक)

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
16:17 06-05-2026