रत्नागिरीत काँग्रेस आघाडीचा धर्म पाळणार – हारिस शेकासन

रत्नागिरी : रत्नागिरी विधानसभा मतदार संघात आम्ही महाविकास आघाडीचा धर्म पाळणार आहोत. नुकतेच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सभेने महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांना बळ मिळाले आहे.

माजी आमदार हुस्नबानू खलिफे यांनीही कार्यकर्त्यांना आघाडीचा धर्म पाळून जास्तीत जास्त प्रचारयंत्रणा राबवण्याच्या सूचना दिल्या आहेत, अशी माहिती रत्नागिरी जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष हारिस शेकासन यांनी दिली.

सध्या संपूर्ण महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. राज्यात महाविकास आघाडीचा ९०-९०-९० असा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला. रत्नागिरी जिल्ह्यात अधिकृतरित्या काँग्रेस पक्षाला एकही जागा मिळू शकली नाही. खेड, दापोली मतदार संघात माजी आमदार संजय कदम, गुहागरला आमदार भास्कर जाधव, चिपळूण-संगमेश्वर मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे प्रशांत यादव, रत्नागिरीत माजी आमदार बाळ माने आणि राजापूरमध्ये आमदार राजन साळवी यांना उमेदवारी देण्यात आली आहे. आम्ही सगळे काँग्रेस कार्यकर्ते पक्षादेश मानणारे आहोत, संघटना मानणारे आहोत. आमच्यासाठी संघटना पक्ष मोठा आहे, असे सांगत शेकासन यांनी प्रचारकार्याला वेग आल्याचे सांगितले.

रत्नागिरी विधानसभा मतदार संघात काँग्रेस पक्षाचे बहुसंख्य कार्यकर्ते आहेत. त्यांना सुद्धा काँग्रेस पक्षाची पक्ष संघटना मान्य आहे. त्यामुळे हे सर्व कार्यकर्ते पक्षादेश मानणारे आहेत. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उमेदवार माजी आमदार बाळ माने यांच्या पाठीशी आम्ही ठामपणे उभे राहणार आहोत. काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून त्यांचा प्रामाणिकपणे प्रचार करणार आहोत असेही शेकासन म्हणाले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:12 08-11-2024