Kunbi Samaj Khed Conference: अनिष्ट प्रथांना फाटा आणि लग्नकार्यातील उधळपट्टीला आळा; लवेल विभागातील कुणबी समाजाचा महत्त्वपूर्ण निर्धार

Kunbi Samaj Khed Conference: अनिष्ट प्रथांना फाटा आणि लग्नकार्यातील उधळपट्टीला आळा; लवेल विभागातील कुणबी समाजाचा महत्त्वपूर्ण निर्धार

शिक्षण, रोजगार आणि स्पर्धा परीक्षांसाठी बचत केलेल्या पैशांचा वापर करण्याचे आवाहन; कुणबी समाजोन्नती संघाची मोहीम

खेड : कुणबी समाजातील अनिष्ट प्रथा, कालबाह्य रूढी आणि विवाह सोहळ्यांसह विविध धार्मिक-सामाजिक कार्यक्रमांमध्ये होणाऱ्या अनावश्यक खर्चाला आळा घालण्यासाठी कुणबी समाज आक्रमक व सकारात्मक मोडमध्ये आला आहे. कुणबी समाजोन्नती संघ मुंबई या मातृसंस्थेच्या मार्गदर्शनाखाली खेड तालुक्यातील लवेल विभागात पार पडलेल्या विशेष सभेत समाजात विधायक बदल घडवून आणण्याचा आणि साधेपणाला प्राधान्य देण्याचा ठाम निर्धार करण्यात आला.

७ जूनच्या कुणबी समाज परिषदेतील ठरावांची अंमलबजावणी

कुणबी समाजोन्नती खेड (मुंबई व ग्रामीण), कुणबी युवा आणि कुणबी महिला यांच्या संयुक्त विद्यमाने ७ जून रोजी भव्य कुणबी समाज परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या परिषदेत समाजातील अवाजवी खर्चाला आळा घालण्याबाबत महत्त्वपूर्ण ठराव मंजूर करण्यात आले होते. या ठरावांची अंमलबजावणी समाजाच्या तळागाळातील प्रत्येक कुटुंबापर्यंत व्हावी, यासाठी सध्या खेड तालुक्यात विभागनिहाय जनजागृती सभांचे आयोजन केले जात आहे.

Arihant 4

शिक्षण आणि रोजगारासाठी बचतीचा वापर करण्याचा संदेश

लवेल येथील सभेत बोलताना समाजबांधवांनी विवाह आणि इतर समारंभांमधील वाढत्या खर्चामुळे सर्वसामान्य कुटुंबांवर पडणाऱ्या आर्थिक बोझ्यावर चिंता व्यक्त केली. सामाजिक प्रतिष्ठेपोटी होणाऱ्या अनावश्यक खर्चाला फाटा देऊन वाचवलेली ही आर्थिक साधने तरुण पिढीच्या दर्जेदार शिक्षणासाठी, रोजगारासाठी, नवनवीन व्यवसायांसाठी तसेच स्पर्धा परीक्षांच्या (MPSC/UPSC) तयारीसाठी वापरण्याचा महत्त्वपूर्ण संदेश या सभेतून देण्यात आला.

महिला व युवकांचा सहभाग वाढवण्यावर भर

सभेत केवळ अनिष्ट प्रथांवरच नव्हे, तर महिलांचा सामाजिक व आर्थिक सहभाग वाढवणे, तरुणांना विविध क्षेत्रांत पुढे जाण्यास प्रोत्साहन देणे आणि समाजात एकोपा मजबूत करणे यावरही सविस्तर चर्चा झाली. केवळ कागदावर ठराव न ठेवता प्रत्येक समाजबांधवाने स्वतःपासून या सकारात्मक बदलाची सुरुवात करावी, असे आवाहन करण्यात आले.

या सभेला कुणबी समाजोन्नती संघ मुंबई ग्रामीणचे अध्यक्ष कृष्णा आग्रे, सचिव सचिन गोवळकर, खजिनदार सुधीर वैराग, सेवा संघ लवेल विभागाचे अध्यक्ष दीपक शिगवण यांच्यासह मोठ्या संख्येने स्थानिक समाजबांधव, महिला व युवक उपस्थित होते.