रत्नागिरी व सिंधुदुर्गात सुमारे २ लाख ८७ हजार हेक्टर क्षेत्र पडीक; महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे जमीनधारकांना उत्पादन सुरू करण्याचे आवाहन
Konkan Fallow Land Issue च्या संदर्भात कोकण विभागातील पाच जिल्ह्यांमध्ये तब्बल ३ लाख ७४ हजार २०० हेक्टर जमीन पडीक असल्याचे महाराष्ट्र शासनाच्या २०२३-२४ च्या जमीन वापरविषयक आकडेवारीतून समोर आले आहे. यामध्ये रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या दोन जिल्ह्यांतील पडीक क्षेत्राचा वाटा सर्वाधिक असून, दोन्ही जिल्ह्यांत मिळून सुमारे २ लाख ८७ हजार हेक्टर जमीन लागवडीबाहेर आहे. मोठ्या प्रमाणावर जमीन खरेदी करून ती पडीक ठेवणाऱ्यांना पुढील तीन ते पाच वर्षांत शेती उत्पादनाखाली जमीन आणण्याचे आवाहन शासनाने केल्याने हा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
कोकणातील शेतीचे स्वरूप, भातशेती, आंबा-काजू बागायती आणि भौगोलिक परिस्थिती पाहता एवढ्या मोठ्या क्षेत्रातील शेती उत्पादनाबाहेर राहणे हा चिंतेचा विषय ठरत आहे. दरम्यान, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मोठ्या प्रमाणावर जमीन खरेदी करून ती पडीक ठेवणाऱ्या जमीनधारकांनी पुढील तीन ते पाच वर्षांत शेती उत्पादन सुरू करावे, अशी भूमिका मांडली आहे; मात्र स्वतःची शेती करणाऱ्या सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या जमिनी शासन ताब्यात घेणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
Konkan Fallow Land Issue: जिल्हानिहाय पडीक क्षेत्राची आकडेवारी
महाराष्ट्र शासनाच्या २०२३-२४ च्या नोंदीनुसार कोकण विभागातील चालू पड आणि इतर पड मिळून नोंदवलेले एकूण पडीक क्षेत्र खालीलप्रमाणे आहे:

रत्नागिरी: १ लाख ७१ हजार ३०० हेक्टर
सिंधुदुर्ग: १ लाख १५ हजार ७०० हेक्टर
रायगड: ५९ हजार ६०० हेक्टर
पालघर: १३ हजार ९०० हेक्टर
ठाणे: १३ हजार ७०० हेक्टर
विशेष म्हणजे, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या दोन जिल्ह्यांतील पडीक क्षेत्र कोकण विभागाच्या एकूण पडीक क्षेत्राच्या सुमारे ७७ टक्के इतके आहे.
शेतीपासून दूर जाण्याची कारणे आणि धोरणात्मक अपेक्षा
कोकणातील पडीक जमिनींचा प्रश्न केवळ जमीन ताब्यात घेण्यापुरता मर्यादित नसून, त्यामागे अनेक स्थानिक अडचणी आहेत. शेतीसाठी मजुरांची कमतरता, वाढता उत्पादन खर्च, वन्यप्राण्यांचा उपद्रव, सिंचनाच्या मर्यादा, बाजारपेठेतील अनिश्चितता आणि तरुण पिढीचे शेतीकडे झालेले दुर्लक्ष या कारणांचाही विचार करणे आवश्यक ठरत आहे.
त्यामुळे ही पडीक जमीन पुन्हा लागवडीखाली आणण्यासाठी शासन कोणती धोरणात्मक पावले उचलणार, सर्वसामान्य शेतकऱ्यांना कोणत्या सुविधा देणार आणि मोठ्या जमीनधारकांसाठी कोणती अंमलबजावणी यंत्रणा तयार करणार, याकडे कोकणातील शेतकरी व नागरिकांचे लक्ष लागले आहे.













