रत्नागिरीत प्रांताधिकारी जीवन देसाईंची गुन्हेगारांवर धडक कारवाई; अंमली पदार्थ तस्करांसह आणखी चौघे चार जिल्ह्यांतून तडीपार

रत्नागिरीत प्रांताधिकारी जीवन देसाईंची गुन्हेगारांवर धडक कारवाई; अंमली पदार्थ तस्करांसह आणखी चौघे चार जिल्ह्यांतून तडीपार

गेल्या तीन वर्षांत तब्बल २१ गुन्हेगारांना दाखवला बाहेरचा रस्ता; कडक प्रशासकीय भूमिकेचे जनतेतून जोरदार स्वागत

रत्नागिरी : राज्यात सध्या धडक आणि कर्तव्यदक्ष कारवाईसाठी ओळखले जाणारे अधिकारी तुकाराम मुंढे यांच्या प्रशासकीय शैलीची चर्चा सुरू असतानाच, रत्नागिरीमध्येही प्रांताधिकारी जीवन देसाई यांनी अवैध धंदे आणि गुन्हेगारी जगताला धडकी भरवणारी धडक मोहीम राबवली आहे. रत्नागिरी पोलिसांनी अंमली पदार्थ (ड्रग्ज) विरोधी मोहिमेअंतर्गत दाखल केलेल्या प्रस्तावांवर कोणतीही दयामाया न दाखवता प्रांताधिकारी देसाई यांनी कठोर पावले उचलली आहेत. आज शहर पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील आणखी चार सराईत गुन्हेगारांना रत्नागिरीसह चार जिल्ह्यांतून दोन वर्षांसाठी हद्दपार करण्याचे आदेश जारी करण्यात आले असून, गेल्या तीन वर्षांत प्रांताधिकाऱ्यांनी तडीपार केलेल्या गुन्हेगारांची संख्या आता तब्बल २१ वर पोहोचली आहे.

अंमली पदार्थांची विक्री करणाऱ्यांवर प्रशासनाचा थेट प्रहार :

रत्नागिरी जिल्ह्यात अंमली पदार्थांचे जाळे मुळासकट नष्ट करण्यासाठी पोलीस दलाने विशेष मोहीम हाती घेतली आहे. शाळा, महाविद्यालये आणि तरुण पिढीला नशेच्या विळख्यात ओढणाऱ्या अंमली पदार्थ विक्रेत्यांवर केवळ गुन्हे दाखल न करता त्यांना जिल्ह्यातून हद्दपार करण्याची आक्रमक भूमिका प्रशासनाने घेतली आहे. या पार्श्वभूमीवर प्रांताधिकारी जीवन देसाई यांनी अंमली पदार्थांसह गंभीर गुन्ह्यांतील गुन्हेगारांना थेट तडीपारीचा दणका दिला आहे.

Arihant 4

चार सराईत गुन्हेगारांना चार जिल्ह्यांतून दोन वर्षांसाठी तडीपार :

रत्नागिरी शहर पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवर असलेल्या चार आरोपींविरुद्ध २०२५ मध्ये हद्दपारीचे प्रस्ताव उपविभागीय दंडाधिकाऱ्यांकडे सादर करण्यात आले होते. या प्रस्तावांची सुनावणी पूर्ण करून प्रांताधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी जीवन देसाई यांनी चौघांनाही दोन वर्षांच्या कालावधीसाठी रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड आणि कोल्हापूर या चार जिल्ह्यांच्या हद्दीतून तडीपार करण्याचे अंतिम आदेश पारित केले आहेत.

हद्दपार करण्यात आलेल्या आरोपींची नावे :

१) नजफ आसिफ मिरजकर (रा. गवळीवाडा, रत्नागिरी)

२) मस्तान मगदूम शेख (रा. खान कॉम्प्लेक्स, मच्छी मार्केट, बाजारपेठ, रत्नागिरी)

३) अब्दुल रौफ इकबाल डोंगरकर (रा. कर्ला उर्दू शाळेजवळ, रत्नागिरी)

४) सचिन राजाराम म्हापुसकर (रा. गवळीवाडा, रत्नागिरी)

या सर्व आरोपींना चारही जिल्ह्यांच्या कार्यक्षेत्रात दोन वर्षे प्रवेश करण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे.

तीन वर्षांत तब्बल २१ गुन्हेगारांवर कारवाईचा बडगा :

सन २०२३ पासून प्रांताधिकारी जीवन देसाई यांनी गुन्हेगारी प्रवृत्तींना आळा घालण्यासाठी अत्यंत कडक धोरण अवलंबले आहे. आजवर एकूण २१ सराईत गुन्हेगारांना विविध मुदतीसाठी हद्दपार करण्यात आले आहे. पोलिसांकडून येणाऱ्या प्रत्येक संवेदनशील प्रस्तावावर वस्तुनिष्ठ आणि कायदेशीर चौकटीत राहून तात्काळ कारवाई करण्याच्या त्यांच्या या कार्यपद्धतीमुळे गुन्हेगारी जगतात मोठी खळबळ उडाली आहे.

पोलीस आणि महसूल समन्वयाचे जनतेतून मोठे स्वागत :

रत्नागिरी शहर व परिसरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलीस दलाने केलेल्या पाठपुराव्याला प्रांताधिकारी जीवन देसाई यांनी न्याय देत ही धडक कारवाई केली आहे. अंमली पदार्थ विक्रेते आणि समाजकंटकांवर कठोर कारवाई झाल्यामुळे शहरातील सर्वसामान्य नागरिकांमधून आणि पालकवर्गाकडून या निर्णयाचे उत्स्फूर्त स्वागत होत आहे.