Angaraki Sankashti Ganpatipule: अंगारकी संकष्टी निमित्ताने गणपतीपुळ्यात भाविकांची अलोट गर्दी; पहाटे साडेतीनपासून दर्शनासाठी रांगा

Angaraki Sankashti Ganpatipule: अंगारकी संकष्टी निमित्ताने गणपतीपुळ्यात भाविकांची अलोट गर्दी; पहाटे साडेतीनपासून दर्शनासाठी रांगा

श्रींच्या पालखी मिरवणुकीने आणि ‘गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषाने गणपतीपुळे परिसर भक्तीमय; प्रशासनाचे नेटके नियोजन

गणपतीपुळे :
अंगारकी संकष्टी चतुर्थीच्या शुभमुहूर्तावर प्रसिद्ध क्षेत्र गणपतीपुळे येथे श्री देव गणपतीच्या दर्शनासाठी भाविकांनी पहाटेपासूनच प्रचंड गर्दी केली होती. अंगारकीनिमित्त गणपतीपुळ्यात मोठ्या जत्रेचे वातावरण निर्माण झाले होते. या पवित्र पर्वाचे औचित्य साधून श्री देव गणपतीपुळे मंदिर प्रशासनाच्या वतीने पहाटे साडेतीन वाजताच मंदिराचे दरवाजे भाविकांसाठी खुले करण्यात आले.

धार्मिक विधी अन् भाविकांचा जयघोष
पहाटे मंदिर उघडल्यानंतर सर्वप्रथम मंदिराच्या मुख्य पुजाऱ्यांच्या हस्ते श्रींची भावपूर्ण पूजाअर्चा, मंत्रपुष्प आणि महाआरती संपन्न झाली. या धार्मिक विधींनंतर रांगेत वाट पाहणाऱ्या हजारो भाविकांना शिस्तबद्धतेने दर्शनासाठी सोडण्यात आले. दिवसभरात हजारो भक्तांनी श्री गणरायाचे दर्शन घेऊन नवस फेडले.

सायंकाळी वाजत-गाजत श्रींची पालखी मिरवणूक
सायंकाळच्या सुमारास श्री देव गणपतीपुळे देवस्थानच्या वतीने श्रींची पालखी वाजत-गाजत बाहेर काढण्यात आली. मंदिराच्या पारंपरिक प्रदक्षिणा मार्गावरून ढोल-ताशांच्या गजरात अन् भक्तिमय वातावरणात ही मिरवणूक काढण्यात आली. या संपूर्ण सोहळ्यात भाविकांनी ‘गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया’चा प्रचंड जयघोष करत परिसर दुमदुमून टाकला.

Arihant 2

देवस्थानचे नियोजन अन् कडक पोलीस बंदोबस्त
अंगारकी संकष्टीनिमित्त येणाऱ्या अलोट गर्दीचा विचार करून श्री देव गणपतीपुळे देवस्थान ट्रस्टच्या वतीने पिण्याचे पाणी, दर्शन रांगा आणि इतर नागरी सुविधांचे नीटनेटके व सुटसुटीत नियोजन करण्यात आले होते. तसेच कोणताही अनुचित प्रकार घडू नये आणि वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी परिसरात कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.