Lanja Drought Affected List: लांजा तालुक्याचा दुष्काळग्रस्त यादीत समावेश करा; शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाची नायब तहसीलदारांकडे मागणी

Lanja Drought Affected List: लांजा तालुक्याचा दुष्काळग्रस्त यादीत समावेश करा; शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाची नायब तहसीलदारांकडे मागणी

दुष्काळ जाहीर करण्यासह निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकतेची निष्पक्ष चौकशी करण्याची निवेदनाद्वारे मागणी

लांजा : शासनाच्या दुष्काळग्रस्त तालुक्यांच्या यादीत लांजा तालुक्याचा समावेश करण्यात आला नसल्याने तीव्र असंतोष व्यक्त केला जात आहे. लांजा तालुक्याचा दुष्काळग्रस्त यादीत समावेश करावा आणि निवडणूक प्रक्रियेच्या पारदर्शकतेबाबत उपस्थित झालेल्या प्रश्नांची निष्पक्ष चौकशी करावी, अशा दोन प्रमुख मागण्यांचे निवेदन शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) लांजा तालुक्याच्या वतीने नायब तहसीलदार सुरेंद्र भोजे यांच्याकडे सोमवारी सादर करण्यात आले.

Lanja Drought Affected List साठी वस्तुनिष्ठ फेरपडताळणीची मागणी
निवेदनात नमूद केले आहे की, राज्यातील अनेक तालुक्यांचा दुष्काळग्रस्त यादीत समावेश झालेला असताना लांजा तालुका वगळण्यात आला आहे. केवळ कागदोपत्री आकडेवारीवर निर्णय न घेता तालुक्याची गावनिहाय फेरपडताळणी करावी. महसूल व कृषी विभागाच्या संयुक्त पथकाद्वारे प्रत्यक्ष पीकस्थिती, पाण्याची उपलब्धता आणि पीक नुकसानीचे मूल्यांकन करून अहवाल शासनाकडे सादर करावा, अशी मागणी करण्यात आली आहे.

निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकतेवर प्रश्न अन् चौकशीची मागणी
दुष्काळाच्या मागणीसोबतच निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकतेबाबतही गंभीर प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या कार्यकाळातील निवडणूक प्रक्रियेबाबत समोर आलेल्या मुद्द्यांची स्वतंत्र व निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी निवेदनात केली आहे. नवीन मतदार नोंदणी, मतदारांची नावे वगळणे, Form-6 मधील बदल आणि मतदार यादीच्या IT प्रणालीचे केंद्रीकरण यांसारख्या बाबींची सखोल तपासणी करून पारदर्शकता जनतेसमोर आणावी, असे निवेदनात नमूद आहे.

Mahrashi karve ANM

प्रमुख पदाधिकारी अन् शिवसैनिकांची उपस्थिती
यावेळी शिवसेना तालुका अध्यक्ष युवराज हांदे, माजी उपसभापती सुभाष रामाणे, लांजा उपशहरप्रमुख प्रकाश गुरव, विभागप्रमुख लक्ष्मण मोरे, विश्वास मांडवकर, मंगेश जाधव, उपविभागप्रमुख शांताराम गुरव, राजेंद्र सुर्वे, अल्लाउद्दीन नेवरेकर, सुभाष तावडे, शाखाप्रमुख उमेश पडीलकर, वसंत गुरव, अनिल सोलकर, युवा अधिकारी अक्षय कुरूप, दिनेश गुरव, पुनस सरपंच संतोष लिंगायत यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.