FDA Infant Food Regulations Maharashtra: ‘आईचे दूध सर्वोत्तम’ लिहायलाच हवे! पॅकबंद बेबी फूडबाबत एफडीएचे कडक आदेश

FDA Infant Food Regulations Maharashtra: 'आईचे दूध सर्वोत्तम' लिहायलाच हवे! पॅकबंद बेबी फूडबाबत एफडीएचे कडक आदेश

बेबी फूडच्या पॅकेटवर आई-बाळाचा फोटो वापरण्यास बंदी; तुकाराम मुंढेंचा मोठा निर्णय

मुंबई :
FDA Infant Food Regulations Maharashtra अंतर्गत अन्न व औषध प्रशासन (FDA) विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी पत्रकार परिषद घेत बालकांच्या आरोग्याबाबत एक अत्यंत महत्त्वाचा आणि कडक निर्णय जाहीर केला आहे. अन्न व औषध प्रशासनाने आतापर्यंत २२ नियम (Regualtions) आणि ११ आदेश जारी केले असून, आता २ वर्षांपर्यंतच्या नवजात बालकांसाठीच्या पॅकबंद शिशु अन्नाबाबत (Infant Food/Formula) नवीन मार्गदर्शक सूचना व आदेश जारी करण्यात आले आहेत.

FDA Infant Food Regulations Maharashtra: स्तनपानाचे घटते प्रमाण अन् आरोग्यावर होणारे गंभीर परिणाम
पत्रकार परिषदेत माहिती देताना तुकाराम मुंढे यांनी सांगितले की, राज्यातील ६ महिन्यांपेक्षा लहान बालकांमधील आईच्या स्तनपानाचे प्रमाण गेल्या ५ वर्षांत ६३.७ टक्क्यांवरून घसरून ५५ टक्क्यांवर आले आहे. शहरी भागात हे प्रमाण ५२ टक्के, तर ग्रामीण भागात ७५ टक्के आहे. बाळाच्या जन्मानंतर पहिल्या १ तासात स्तनपान होणे गरजेचे असते, मात्र महाराष्ट्रातील ५० टक्के माता तासाभरात स्तनपान करत नसल्याची चिंताजनक आकडेवारी समोर आली आहे.

चुकीच्या आहारपद्धती आणि डिब्बाबंद अन्नाच्या अतिवापरामुळे मुलांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत असून, १० ते १२ वयोगटातील ३५ टक्के मुलांमध्ये उच्च रक्तदाब (High BP) आणि १० ते १९ वयोगटात १२.३ टक्के मधुमेहाचे प्रमाण दिसून येत असल्याचे त्यांनी नमूद केले.

Hotel waiter

२ वर्षांखालील बालकांच्या अन्नासाठी ५ महत्त्वाचे नियम
राज्यभरात केलेल्या तपासणीत अनेक कंपन्यांच्या प्रॉडक्ट्सवर आवश्यक इशारा व सूचना नसल्याचे आढळल्याने एफडीएने उत्पादक, ब्रँड मालक, पुरवठादार आणि ई-कॉमर्स विक्रेत्यांसाठी खालील ५ कडक अटी लागू केल्या आहेत:

आईचे दूध सर्वोत्तम: सर्व पॅकेजिंगच्या पुढील भागावर ‘आईचे दूध हे शिशुसाठी सर्वोत्तम दूध आहे’ हे ठळकपणे लिहावे लागेल.

वैद्यकीय सल्ला: ‘मेडिकल प्रिस्क्रिप्शनच्या (डॉक्टरांच्या) सल्ल्यानुसारच वापर करावा’ असा उल्लेख अनिवार्य असेल.

पर्याय नाही: ‘हे अन्न आईच्या दुधाचा एकमेव पर्याय नाही’ असे स्पष्ट नमूद करावे लागेल.

पूरक आहार: ‘हे सप्लिमेंटरी (पूरक) फूड असून ६ महिन्यांनंतरच वापर करावा’ अशी सूचना द्यावी लागेल.

छायाचित्रांवर बंदी: पॅकेजवर आई आणि बाळाचा फोटो वापरण्यास पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे.

जाहिरातबाजी, मोफत सॅम्पल अन् कूपन्सवर बंदी
तुकाराम मुंढे यांनी स्पष्ट केले की, अशा सप्लिमेंट्स प्रॉडक्ट्सचा कोणताही प्रचार किंवा जाहिरातबाजी करता येणार नाही. ‘आईच्या दुधाच्या समकक्ष’ असल्याचा दावा करणारी जाहिरात करणे कायदेशीर गुन्हा ठरेल. याशिवाय मोफत नमुने (Free Samples) देणे किंवा डिस्काउंट कूपन्स देणे यावरही पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे.