२ आणि ३ ऑक्टोबर रोजी गोगटे-जोगळेकर महाविद्यालयात रंगणार सोहळा; Alka Deo Marulkar Samarpana 2026 अंतर्गत रंगणार शास्त्रीय संगीताची भव्य मैफल
रत्नागिरी : Alka Deo Marulkar Samarpana 2026 संगीत सोहळ्याच्या माध्यमातून रत्नागिरीकर रसिकांना येत्या २ आणि ३ ऑक्टोबर रोजी शास्त्रीय संगीताची अद्भुत पर्वणी लाभणार आहे. नामवंत शास्त्रीय गायिका विदुषी डॉ. अलका देव मारुलकर यांच्या अमृत महोत्सवानिमित्त ‘समर्पण २०२६’ हा कै. सुरेश आणि शशिकांत डुबळे स्मृति १२ वा शास्त्रीय संगीत समारोह रत्नागिरीत आयोजित करण्यात आला आहे. गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाच्या राधाबाई शेट्ये सभागृहात हा दोन दिवशीय संगीत सोहळा पार पडणार आहे.
पर्वरी (गोवा) येथील प्रियांशु सांस्कृतिक संस्था, गोवा कला व संस्कृती संचालनालय आणि ‘स्वराभिषेक-रत्नागिरी’ यांच्या संयुक्त विद्यमाने या संगीत सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवात डॉ. अलका देव-मारुलकर यांच्या मुख्य गायनासह गोवा आणि रत्नागिरीतील नामांकित तसेच उगवत्या शास्त्रीय गायक-कलाकारांचे सादरीकरण होणार आहे. सर्व संगीत रसिकांसाठी हा कार्यक्रम पूर्णपणे विनामूल्य खुला ठेवण्यात आला आहे.
शुक्रवार, २ ऑक्टोबर रोजी दुपारी साडेतीन वाजता या मैफलीचा शुभारंभ होईल. पहिल्या सत्रात स्वराभिषेकचे शिष्य मीरा बापट, स्वरा भागवत, मृणाल जोशी, हर्षदा सावंत, मधुरा लाकडे, ऋग्वेदा हळबे, दिया परब, ऋग्वेद तेरेदेसाई, साई शिर्के, अन्वी आठल्ये आणि नीलश्री लोटलीकर यांचे ईश्वस्तवन व रागगायन होणार आहे. त्यानंतर विदुषी डॉ. अलका देव मारुलकर यांच्या मुख्य गायनाची मैफल रंगेल. त्यांना सुप्रसिद्ध संवादिनीवादक अजय जोगळेकर (संवादिनी) आणि गोव्याचे डॉ. उदय कुलकर्णी (तबला) हे साथसंगत करतील.

शनिवार, ३ ऑक्टोबर रोजी सकाळच्या सत्रात साडेनऊ वाजता तन्वी मोरे, चैतन्य परब (रत्नागिरी) आणि गोव्याच्या डॉ. शिल्पा डुबळे परब यांचे गायन होईल. तर दुपारच्या सत्रात स्वराभिषेकच्या शिष्या दीप्ती आगाशे, ऐश्वर्या सावंत, गौतमी वाडकर, राधा केळकर यांच्यासह गोव्याच्या श्रेया देवधर, तेजा ढवळीकर, समीक्षा भोबे काकोडकर, स्वराभिषेकच्या संचालिका विनया परब आणि डॉ. शिल्पा डुबळे यांचे सुरेल सादरीकरण पार पडणार आहे.
या दोन दिवशीय महोत्सवात चैतन्य पटवर्धन, मंगेश मोरे आणि वरद सोहनी संवादिनीची (हार्मोनियम) साथ देतील, तर केदार लिंगायत, प्रथमेश शहाणे, अभिषेक भालेकर आणि उत्पल सायनेकर (मुंबई) तबलासाथ सांभाळतील. कार्यक्रमाचे ध्वनी संयोजन एस. कुमार साऊंडचे उदयराज सावंत यांचे आहे. या संगीत सोहळ्यादरम्यान ज्येष्ठ संगीत समुपदेशक, संगीतकार, गायिका आणि मुंबईतील ‘कलांगण’च्या संस्थापिका डॉ. वर्षा भावे यांचा विशेष सन्मान करण्यात येणार आहे. रत्नागिरीतील संगीतप्रेमींनी या महोत्सवाला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.













