मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत करारांवर स्वाक्षऱ्या; आयटी, सेमिकंडक्टर व क्लीनटेक क्षेत्रात सर्वाधिक गुंतवणूक
मुंबई : राज्याच्या औद्योगिक आणि आर्थिक विकासाला अभूतपूर्व गती देणारे अत्यंत महत्त्वपूर्ण यश महाराष्ट्राला मिळाले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत या समिटमध्ये तब्बल ८ लाख ५७ हजार ४५२ कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचे ६७ सामंजस्य करार (MoUs) करण्यात आले आहेत. या प्रचंड गुंतवणुकीच्या माध्यमातून राज्यात तब्बल २ लाख ९१ हजार १०९ नवीन रोजगार निर्माण होणार असून, राज्यातील तरुणांसाठी रोजगाराच्या अथांग संधी उपलब्ध होणार आहेत.
या गुंतवणूक करारांमध्ये तंत्रज्ञानाशी संबंधित क्षेत्रांनी मोठी बाजी मारली आहे. डेटा सेंटर्स, माहिती-तंत्रज्ञान (IT) आणि सेमिकंडक्टर क्षेत्रामध्ये सर्वाधिक म्हणजे ४ लाख १५ हजार ४९० कोटी रुपयांची गुंतवणूक प्रस्तावित करण्यात आली आहे. याशिवाय एरोस्पेस व संरक्षण (Aerospace & Defence) क्षेत्रात तसेच ऊर्जा आणि क्लीनटेक (Cleantech) क्षेत्रात प्रत्येकी १० महत्त्वाचे करार पार पडले आहेत. या करारांमुळे आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित उद्योगांचे जाळे राज्यभरात विस्तारणार आहे.
समिटमध्ये विविध औद्योगिक क्षेत्रांमध्ये मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक झाली आहे. ऊर्जा, नवीकरणीय ऊर्जा (Renewable Energy), बॅटरी एनर्जी आणि कॉम्प्रेस्ड बायोगॅस क्षेत्रात १ लाख २ हजार ५१९ कोटी रुपयांचे करार झाले. धातू आणि खाणकाम क्षेत्रात ७५ हजार कोटी, तर संरक्षण आणि अंतरिक्ष क्षेत्रात २७ हजार ९३० कोटी रुपयांची गुंतवणूक झाली आहे. इन्फ्रास्ट्रक्चर, लॉजिस्टिक्स आणि बांधकाम साहित्य क्षेत्रात १८ हजार ७५१ कोटी, इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रात १२ हजार ६५१ कोटी, तर रसायने, कृषी, सेवा व ग्लोबल कॅपॅबिलिटी सेंटर्स (GCC) क्षेत्रात ८ हजार ८०१ कोटी रुपयांची गुंतवणूक झाली आहे. याशिवाय स्टील उत्पादनात ७ हजार कोटी, आरोग्य क्षेत्रात ६ हजार ५०० कोटी आणि इतर विविध क्षेत्रांत १ लाख ८२ हजार ८१० कोटी रुपयांची गुंतवणूक प्रस्तावित आहे.

महाराष्ट्र इन्व्हेस्टमेंट समिटच्या माध्यमातून झालेल्या या ऐतिहासिक करारांमुळे मुंबई आणि पुण्याव्यतिरिक्त राज्यातील इतर सर्व भागांमधील स्थानिक औद्योगिक विकासाला आणि रोजगारनिर्मितीला मोठी चालना मिळणार आहे. राज्याच्या औद्योगिक विस्ताराला नवी दिशा देणारा हा समिट महाराष्ट्राला आर्थिक क्षेत्रात अधिक मजबूत करेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.













