ICC World Cup 2027 Schedule: आयसीसी वनडे विश्वचषक २०२७ चे वेळापत्रक जाहीर; १० ऑक्टोबरला महामुकाबला, भारत-पाकिस्तान आमनेसामने

ICC World Cup 2027 Schedule: आयसीसी वनडे विश्वचषक २०२७ चे वेळापत्रक जाहीर; १० ऑक्टोबरला महामुकाबला, भारत-पाकिस्तान आमनेसामने

दक्षिण आफ्रिका, झिम्बाब्वे आणि नामिबियात ५७ सामने; २ ऑक्टोबरपासून सुरु होणार स्पर्धा, भारतीय संघाचा पहिला सामना ऑस्ट्रेलियाविरुद्ध

ICC World Cup 2027 Schedule चे अधिकृत वेळापत्रक आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेकडून (ICC) जाहीर करण्यात आले आहे. दक्षिण आफ्रिका, झिम्बाब्वे आणि नामिबिया यांच्या संयुक्त यजमानपदाखाली पार पडणाऱ्या या प्रतिष्ठेच्या स्पर्धेत तब्बल २४ वर्षांनंतर एकदिवसीय विश्वचषकाचे आफ्रिकन खंडात पुनरागमन होत आहे. या महाकुंभामध्ये १४ उत्कृष्ट संघ, १२ विविध मैदाने आणि एकूण ५७ सामने रंगणार आहेत. २ ऑक्टोबर २०२७ रोजी नामिबियाची राजधानी विंडहोक येथे सुपर सीरिजने स्पर्धेचा नारळ फुटणार असून २१ नोव्हेंबर २०२७ रोजी जोहान्सबर्ग येथे अंतिम सामना खेळवला जाईल.

विश्वचषकातील सर्वाधिक बहुप्रतिक्षित आणि चर्चेत असलेला भारत विरुद्ध पाकिस्तान महामुकाबला १० ऑक्टोबर २०२७ रोजी जोहान्सबर्ग येथील ऐतिहासिक वॉन्डरर्स स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. या हाय-व्होल्टेज सामन्यामुळे जगभरातील क्रिकेटप्रेमींमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे. आयसीसीने या स्पर्धेसाठी १४ संघांची दोन गटांत विभागणी केली आहे. भारतीय संघाचा समावेश ग्रुप ‘ए’ मध्ये करण्यात आला असून या गटात भारतासोबतच ऑस्ट्रेलिया, पाकिस्तान, अफगाणिस्तान, झिम्बाब्वे आणि एका पात्रता फेरीतून येणाऱ्या संघाचा समावेश आहे.

ग्रुप ‘बी’ मध्येही अत्यंत तगडी स्पर्धा पाहायला मिळणार असून यात दक्षिण आफ्रिका, इंग्लंड, न्यूझीलंड, श्रीलंका, बांगलादेश आणि पात्रता फेरीतील दुसऱ्या संघाचा समावेश करण्यात आला आहे. भारतीय संघाच्या मोहिमेची सुरुवात ७ ऑक्टोबर २०२७ रोजी केप टाऊन येथे बलाढ्य ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्याने होणार आहे. त्यानंतर १० ऑक्टोबरला पाकिस्तान, १४ ऑक्टोबरला अफगाणिस्तान, १७ ऑक्टोबरला क्वालिफायर-ए आणि २४ ऑक्टोबरला व्हिक्टोरिया फॉल्स येथे झिम्बाब्वेविरुद्ध भारत आपले गट टप्प्यातील सामने खेळेल.

Ratnagiri Khabardar add image

गट टप्प्यानंतर २५ ऑक्टोबर ते १४ नोव्हेंबर दरम्यान ‘सुपर ७’ (Super Stage) फेरीचे सामने खेळवले जातील. या फेरीत अव्वल कामगिरी करणारे चार संघ उपांत्य फेरीत प्रवेश करतील. पहिला उपांत्य सामना १७ नोव्हेंबर रोजी केप टाऊन येथे, तर दुसरा उपांत्य सामना १८ नोव्हेंबर रोजी प्रिटोरिया (Tshwane) येथे रंगणार आहे. या संपूर्ण स्पर्धेचे आयोजन दक्षिण आफ्रिकेतील ८, झिम्बाब्वेतील ३ आणि नामिबियातील १ अशा एकूण १२ आंतरराष्ट्रीय मैदानांवर केले जाणार आहे.