भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त तुळस येथे आयोजन; ५ जिल्ह्यांतील ११ नामवंत भजनी मंडळे आमनेसामने
Vengurla Bhajan Competition 2026 अंतर्गत कोकणातील भजन संस्कृतीचा भव्य जागर तुळस येथे पाहायला मिळणार आहे. भारतीय जनता पार्टी (तुळस) आणि आर.सी. ग्रुप (तुळस) यांच्या संयुक्त विद्यमाने भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून सलग दुसऱ्या वर्षी ‘प्रदेशाध्यक्ष चषक २०२६’ या राज्यस्तरीय निमंत्रित संगीत भजन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा २ आणि ३ ऑक्टोबर २०२६ रोजी तुळस येथील श्री देव जैतिराश्रित संस्थेचे संस्थापक कर्मयोगी कै. रामचंद्र य. तुळसकर सभागृह, श्री शिवाजी हायस्कूल येथे पार पडणार आहे.
या राज्यस्तरीय महासंग्रामात मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या पाच जिल्ह्यांतील नामांकित निमंत्रित भजनी मंडळे सहभागी होत आहेत. शुक्रवारी, २ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ५ वाजता नामांकित कलाकारांच्या भव्य जुगलबंदीने कार्यक्रमाची सुरुवात होईल. त्यानंतर सायंकाळी ६.३० वाजता विविध क्षेत्रांतील मान्यवरांच्या शुभहस्ते या स्पर्धेचे दिमाखदार उद्घाटन संपन्न होणार आहे.
स्पर्धेच्या पहिल्या दिवशी पाच प्रमुख भजनी मंडळांचे सादरीकरण होणार आहे. यामध्ये सायंकाळी ७ वाजता विश्वकर्मा प्रासादिक भजन मंडळ (गठिवडे, मालवण), ८ वाजता ठिकाणदार देव प्रासादिक भजन मंडळ (देवगड), ९ वाजता सद्गुरू प्रासादिक भजन मंडळ (अणासुर, वेंगुर्ला), १० वाजता देव रवळनाथ प्रासादिक भजन मंडळ (पिंगुळी, कुडाळ) आणि रात्री ११ वाजता मेजारेश्वर प्रासादिक भजन मंडळ (नागवे, कणकवली) आपले भजन सादर करतील.

शनिवारी, ३ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ६ वाजल्यापासून दुसऱ्या दिवसाच्या स्पर्धेला सुरुवात होईल. यामध्ये सोमजाई देवी प्रासादिक भजन मंडळ (रायगड), विष्णु स्मृती भजन सेवा संघ (नांदिवली, डोंबिवली), पंचम निशाद भजन मंडळ (दांडेली, सावंतवाडी), हनुमान प्रासादिक भजन मंडळ (भांडुप, ठाणे), ब्राह्मणदेव प्रासादिक भजन मंडळ (उपके, राजापूर) आणि गांगोरानेश्वर प्रासादिक भजन मंडळ (मालाड, मुंबई) यांच्यात सुरांची जुगलबंदी रंगेल. यानंतर मान्यवरांच्या हस्ते भव्य बक्षीस वितरण सोहळा पार पडेल.
भजनप्रेमींसाठी या संपूर्ण महोत्सवाचे थेट प्रक्षेपण (LIVE) ‘प्रहार डिजिटल’ या वाहिनीवर उपलब्ध करून देण्यात आले आहे. तरी सिंधुदुर्गसह संपूर्ण कोकणातील संगीत व भजनप्रेमींनी या सुरेल सोहळ्याचा आनंद घेण्यासाठी तुळस येथे मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजक भारतीय जनता पार्टी (तुळस) व आर.सी. ग्रुप (तुळस) यांच्या वतीने करण्यात आले आहे.













