मोबाईल दुरुस्तीचे सांगून घरातून पडली बाहेर; पुर्णगड सागरी सुरक्षा पोलिसांकडून तपास सुरू
रत्नागिरी : तालुक्यातील गावडे-आंबेरे (हनुमानवाडी) येथील २१ वर्षीय तरुणीचे अज्ञाताने अपहरण केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी पुर्णगड सागरी सुरक्षा पोलिस ठाण्यात अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस संशयिताचा कसून शोध घेत आहेत.
ही घटना २९ सप्टेंबर रोजी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास घडली. याप्रकरणी अपहृत तरुणीची आई दामिनी दामोदर नाटेकर (वय ४५, रा. गावडे आंबेरे, हनुमानवाडी, रत्नागिरी) यांनी पोलिसांत फिर्याद दिली आहे. त्यांच्या तक्रारीवरून पुर्णगड पोलिसांनी अज्ञाताविरुद्ध अपहरणाचा गुन्हा नोंदवला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार यांची मुलगी सानिया दामोदर नाटेकर (वय २१) हिला कोणीतरी फोन करून रत्नागिरी येथे जाऊन मोबाईलचा डिस्प्ले बदलून आणते, असे घरच्यांना सांगण्यास सांगितले. त्यानंतर ती घरातून बाहेर पडली; मात्र दीर्घकाळ उलटूनही ती घरी परतलीच नाही. अज्ञात व्यक्तीने फूस लावून तरुणीचे अपहरण केले आणि तिला बेकायदेशीरपणे कुठेतरी डांबून ठेवले असल्याची शंका तिच्या आईने व्यक्त केली आहे.

या प्रकरणी ३० सप्टेंबर रोजी मध्यरात्री पुर्णगड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी तत्काळ मुलीचा शोध सुरू केला असून, तिचे कॉल डिटेल्स, मोबाईल लोकेशन आणि संपर्कात असलेल्या संशयित व्यक्तींची माहिती गोळा केली जात आहे. अपहरणामागील नेमके कारण काय आणि ही अज्ञात व्यक्ती कोण, याचा शोध घेण्याचे काम पोलिस प्रशासनाकडून वेगाने सुरू आहे.













