Dapoli Snakebite Death: उन्हवरे जाधववाडीत भांडी घासत असताना साप चावून महिलेचा दुर्दैवी मृत्यू

Dapoli Snakebite Death: उन्हवरे जाधववाडीत भांडी घासत असताना साप चावून महिलेचा दुर्दैवी मृत्यू

घरच्या पडवीत घडली दुर्दैवी घटना; डेरवण येथील रुग्णालयात उपचारादरम्यान महिलेची प्राणज्योत मालवली

दापोली : तालुक्यातील उन्हवरे जाधववाडी येथील एका ४९ वर्षीय महिलेला घराच्या पडवीत भांडी घासत असताना विषारी साप चावल्याची गंभीर घटना समोर आली आहे. या दुर्घटनेनंतर उपचारादरम्यान संबंधित महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला असून परिसरात शोकाकुल वातावरण पसरले आहे.

कविता किसन खापरे (वय ४९ वर्षे, रा. उन्हवरे जाधववाडी, पो. वावघर, ता. दापोली, जि. रत्नागिरी) असे मृत महिलेचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, १९ सप्टेंबर २०२६ रोजी सायंकाळी ७:०० वाजण्याच्या सुमारास त्या आपल्या घराच्या मागील पडवीमध्ये पायरीजवळ भांडी घासत होत्या. त्यादरम्यान अचानक आलेल्या विषारी सापाने त्यांच्या डाव्या पायाच्या अंगठ्याला चावा घेतला. सर्पदंश झाल्याचे लक्षात येताच आणि बोटातून रक्त वाहू लागल्याने कुटुंबीयांनी तत्काळ धाव घेतली.

त्यांना तातडीने दापोली येथील उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक औषधोपचारासाठी दाखल करण्यात आले. तेथील डॉक्टरांनी प्रथमोपचार दिल्यानंतर प्रकृतीचे गांभीर्य ओळखून पुढील अधिक उपचारासाठी त्यांना ॲम्बुलन्सद्वारे वालावलकर हॉस्पिटल, डेरवण (ता. चिपळूण) येथे हलवण्यात आले. तेथील अतिदक्षता विभागात (ICU) त्यांच्यावर वैद्यकीय उपचार सुरू होते. मात्र, उपचारादरम्यान डॉक्टरांनी तपासणी करून त्यांना मृत घोषित केले.

Radhakrushna patapedhi

या दुर्दैवी घटनेची नोंद दापोली पोलिस ठाण्यात करण्यात आली असून अकस्मात मृत्यू क्रमांक ७२/२०२६ (बी.एन.एस.एस. कलम १९४ अन्वये) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पावसाळ्याच्या दिवसांत घराभोवती आणि अंधाऱ्या जागी दक्षता बाळगण्याचे आवाहन स्थानिक प्रशासनाकडून केले जात आहे.