CNG Price Hike: गॅस सिलिंडरनंतर आता सीएनजी महागला!

CNG Price Hike: गॅस सिलिंडरनंतर आता सीएनजी महागला!

महानगर गॅस लिमिटेडकडून दर ८९ रुपये प्रति किलो; रिक्षा-टॅक्सी भाडेवाढीची शक्यता

सणासुदीच्या काळात मुंबई आणि आसपासच्या परिसरातील सर्वसामान्य नागरिकांचे आणि वाहनधारकांचे आर्थिक बजेट कोलमडण्याची चिन्हे आहेत. ऑक्टोबरच्या पहिल्याच दिवशी व्यावसायिक एलपीजी गॅस सिलिंडरच्या दरात वाढ झाल्यानंतर, आता मुंबईसह संपूर्ण महानगर क्षेत्रात (MMR) सीएनजीच्या (CNG) दरातही वाढ झाली आहे. या दुहेरी दरवाढीमुळे ऐन सणासुदीत सर्वसामान्यांना महागाईचा मोठा झटका बसला आहे.

महानगर गॅस लिमिटेडने (MGL) १ ऑक्टोबरपासून सीएनजीच्या दरात प्रति किलो १ रुपयाने वाढ करण्याची घोषणा केली आहे. या निर्णयानुसार मुंबई आणि लगतच्या परिसरात सीएनजीचा नवा दर आता ८९ रुपये प्रति किलो झाला आहे. गणेशोत्सव पार पडल्यानंतर अवघ्या काही दिवसांवर नवरात्रोत्सव आणि दसरा येऊन ठेपला आहे. अशा ऐन सणासुदीच्या काळात इंधनाचे दर वाढल्याने पुढील दिवसांत रिक्षा आणि टॅक्सीच्या भाड्यात वाढ होण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे.

कच्च्या मालाच्या निर्मिती खर्चात झालेली वाढ, देशांतर्गत उत्पादित नैसर्गिक वायू आणि आयात केलेल्या पुनर्वायूकृत द्रवीकृत नैसर्गिक वायूच्या (RLNG) किमतींमधील वाढ यांमुळे ही दरवाढ करावी लागल्याचे महानगर गॅस लिमिटेडने स्पष्ट केले आहे. आयात करण्यात येत असलेल्या आरएलएनजीचे दर आंतरराष्ट्रीय गॅस बाजाराशी जोडलेले असल्याने जागतिक बाजारातील किमती वाढल्यामुळे कंपनीचा खरेदी खर्च मोठ्या प्रमाणात वाढला आहे.

Arihant 2

पेट्रोल आणि डिझेलच्या तुलनेत किफायतशीर पर्याय म्हणून मोठ्या संख्येने वाहनधारकांनी सीएनजीकडे आपला मोर्चा वळवला होता. मात्र, एलपीजी सिलिंडर आणि सीएनजी दोन्ही महागल्याने वाहतूक खर्चासोबतच येत्या काही दिवसांत दैनंदिन वस्तूंच्या किमतींवरही याचा परिणाम दिसून येऊ शकतो. बाजार तज्ज्ञांच्या मते, आगामी काळात साखर, डाळी यांसारख्या खाद्यपदार्थांसह एसी, टीव्ही आणि फ्रीज यांसारख्या इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या किमतीतही वाढ होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.