बेवारस बॅगेत आढळला गोवा बनावटीचा मद्यसाठा; जप्त दारू राज्य उत्पादन शुल्काकडे वर्ग
रत्नागिरी : Ratnagiri Railway Liquor Seizure मोहिमेअंतर्गत रेल्वे सुरक्षा दलाने (RPF) गोवा बनावटीच्या दारूची बेकायदेशीर वाहतूक रोखण्यासाठी धडक कारवाई केली आहे. ‘ऑपरेशन सतर्क’ अंतर्गत रत्नागिरी रेल्वेस्थानकावर पार पडलेल्या या कारवाईत गोवा संपर्क क्रांती एक्स्प्रेसच्या इंजिनलगतच्या दुसऱ्या जनरल डब्यातून बेवारस अवस्थेत आढळलेल्या एका बॅगेतून गोवा बनावटीच्या दारूच्या १०० बाटल्या जप्त करण्यात आल्या आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, ३० सप्टेंबर रोजी ट्रेन क्रमांक १२४४९ गोवा संपर्क क्रांती एक्स्प्रेस रत्नागिरी स्थानकात आली असता आरपीएफ पथकाकडून नियमित तपासणी सुरू होती. या तपासणी दरम्यान इंजिनच्या बाजूच्या दुसऱ्या सामान्य डब्यामध्ये एक संशयास्पद व बेवारस बॅग आढळून आली. डब्यातील प्रवाशांकडे विचारणा केली असता कोणीही त्या बॅगेवर दावा केला नाही. त्यामुळे आरपीएफ पथकाने तातडीने ती बॅग ताब्यात घेऊन रत्नागिरी आरपीएफ पोस्टवर आणली.
आरपीएफ ठाण्यात पंचांसमक्ष बॅगेची तपासणी केली असता त्यामध्ये गोवा निर्मित दारूच्या १०० छोट्या बाटल्या आढळून आल्या. त्यानंतर प्रशासनाने नियमानुसार जप्तीचा पंचनामा केला. जप्त करण्यात आलेला हा सर्व मद्यसाठा पुढील कायदेशीर कारवाईसाठी आणि तपासासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या रत्नागिरी शहर शाखेकडे सुपुर्द केला जाणार आहे.

ही धडक कारवाई सहाय्यक उपनिरीक्षक (ASI) अशोक आर्य आणि त्यांच्यासोबत ड्युटीवर असलेल्या आरपीएफ कर्मचाऱ्यांच्या पथकाने केली. सणासुदीच्या काळात रेल्वेतून होणाऱ्या बेकायदेशीर तस्करीला आळा घालण्यासाठी आरपीएफकडून अशी तपासणी सत्रे तीव्र करण्यात आली आहेत.













