१० ऑक्टोबरला रंगणार भारत-पाकिस्तान महामुकाबला; दक्षिण आफ्रिकेत रंगणार ५७ सामने; जाणून घ्या भारतीय संघाचं संपूर्ण Schedule
Team India World Cup 2027 Schedule चे अधिकृत वेळापत्रक जाहीर झाल्याने भारतीय क्रिकेट चाहत्यांची उत्सुकता ताणली गेली आहे. आयसीसी पुरुष वनडे विश्वचषक २०२७ चे यजमानपद दक्षिण आफ्रिका, झिम्बाब्वे आणि नामिबिया या तीन देशांकडे देण्यात आले आहे. तब्बल २४ वर्षांनंतर एकदिवसीय विश्वचषक आफ्रिकन भूमीवर परतत असून या महाकुंभात १४ संघांमध्ये एकूण ५७ सामने रंगणार आहेत. या स्पर्धेत भारतीय संघाचा मार्ग कसा असेल आणि टीम इंडिया फायनलपर्यंत मजल मारणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
आयसीसीने केलेल्या गटवारीनुसार भारतीय संघाचा समावेश ग्रुप ‘ए’ मध्ये करण्यात आला आहे. या गटात भारतासोबतच ऑस्ट्रेलिया, पाकिस्तान, अफगाणिस्तान, झिम्बाब्वे आणि एका पात्रता फेरीतील (Qualifier-A) संघाचा समावेश आहे. तर ग्रुप ‘बी’ मध्ये दक्षिण आफ्रिका, इंग्लंड, न्यूझीलंड, श्रीलंका, बांगलादेश आणि क्वालिफायर-बी संघ आमनेसामने असतील. दोन्ही गटांतील स्पर्धा अत्यंत रंजक आणि आव्हानकारक ठरणार आहे.
भारतीय संघाच्या विश्वचषक मोहिमेची सुरुवात गुरुवार, ७ ऑक्टोबर २०२७ रोजी केप टाऊन येथे ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या हाय-व्होल्टेज सामन्याने होणार आहे. त्यानंतर रविवार, १० ऑक्टोबर रोजी जोहान्सबर्ग येथे भारत आणि पाकिस्तान यांच्यातील बहुप्रतिक्षित महामुकाबला रंगणार आहे. पुढे गुरुवारी, १४ ऑक्टोबरला भारत सेंच्युरियन (Tshwane) येथे अफगाणिस्तानचा सामना करेल. तर रविवारी, १७ ऑक्टोबरला ब्लूमफॉन्टेन येथे क्वालिफायर-ए संघाविरुद्ध लढत होईल. गट टप्प्यातील शेवटचा सामना भारत रविवारी, २४ ऑक्टोबर रोजी व्हिक्टोरिया फॉल्स येथे यजमान झिम्बाब्वेविरुद्ध खेळणार आहे.

गट टप्प्यातील सामने पूर्ण झाल्यानंतर २५ ऑक्टोबर ते १४ नोव्हेंबर दरम्यान ‘सुपर स्टेजेस’ सामने पार पडतील. या फेरीत अव्वल स्थान मिळवणारे चार संघ नॉकआउट फेरीत धडक मारतील. स्पर्धेचा पहिला उपांत्य सामना १७ नोव्हेंबरला केप टाऊन येथे, तर दुसरा उपांत्य सामना १८ नोव्हेंबरला सेंच्युरियन येथे खेळवला जाईल. या संपूर्ण क्रिकेट महाकुंभाचा अंतिम सामना रविवार, २१ नोव्हेंबर २०२७ रोजी जोहान्सबर्ग येथे रंगणार आहे.













