Devrukh College MU Pragya Launch: देवरुखातील आठल्ये-सप्रे-पित्रे महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी ‘एमयु-प्रज्ञा’ मानसशास्त्रीय चाचणीचा शुभारंभ

Devrukh College MU Pragya Launch: देवरुखातील आठल्ये-सप्रे-पित्रे महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी 'एमयु-प्रज्ञा' मानसशास्त्रीय चाचणीचा शुभारंभ

विद्यार्थ्यांचे मानसिक आरोग्य, व्यक्तिमत्त्व अन् करिअरचा कल जाणून घेण्यास मदत; ऑनलाइन मूल्यमापन सुरू

देवरुख : विद्यार्थ्यांचे मानसिक आरोग्य, व्यक्तिमत्त्व आणि करिअरविषयक कल जाणून घेण्यासाठी मानसशास्त्रीय मूल्यांकनाचा शुभारंभ देवरुख शिक्षण प्रसारक मंडळाच्या आठल्ये-सप्रे-पित्रे स्वायत्त महाविद्यालयात करण्यात आला आहे. मुंबई विद्यापीठाच्या मार्गदर्शनाखाली ‘एमयु-प्रज्ञा’ या विशेष उपक्रमाद्वारे ही मोहीम सुरू करण्यात आली आहे.

‘एमयू-प्रज्ञा (मुंबई युनिव्हर्सिटी-सायकोलॉजिकल रेझिलियन्स असेसमेंट फॉर डेव्हलपमेंट अँड नर्चरिंग ऑफ यंग अडल्ट्स)’ या उपक्रमाचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांचे मानसिक आरोग्य, व्यक्तिमत्त्व, आवडी-निवडी, मानसिक लवचिकता तसेच करिअरचा कल समजून घेणे हा आहे. विद्यार्थ्यांच्या गरजा ओळखून त्यांना आवश्यक मार्गदर्शन व सहाय्य उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने हा उपक्रम अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

महाविद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांनी या ‘एमयू-प्रज्ञा टेस्ट’ मध्ये सहभागी होऊन चाचणी पूर्ण करावी, असे आवाहन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नरेंद्र तेंडोलकर यांनी केले आहे. ही चाचणी संपूर्णपणे ऑनलाइन पद्धतीने घेतली जात असून, विद्यार्थी ती महाविद्यालयातून किंवा घरूनही सोयीनुसार शांतपणे पूर्ण करू शकतात. चाचणी देताना कोणताही ताण न घेता विद्यार्थ्यांनी सर्व प्रश्न काळजीपूर्वक वाचून आपल्या वास्तविक अनुभव, भावना आणि आवडीनुसार प्रामाणिकपणे उत्तरे देणे अपेक्षित आहे. या चाचणीत योग्य किंवा अयोग्य अशी उत्तरे नसून विद्यार्थ्यांचे वास्तविक व्यक्तिमत्त्व समजून घेणे हा मुख्य हेतू आहे.

Arihant 2

विद्यार्थ्यांना ही प्रक्रिया सुलभ व्हावी यासाठी महाविद्यालयामार्फत सोप्या पायऱ्यांच्या सूचना (Step-by-step guidance) उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. चाचणी पूर्ण झाल्यानंतर विद्यार्थ्यांना त्वरित ‘इन्स्टंट रिपोर्ट’ जनरेट करून स्वतःचा अहवाल डाऊनलोड करता येणार आहे. यामुळे विद्यार्थ्यांना आपल्या व्यक्तिमत्त्वातील विविध पैलूंची प्राथमिक माहिती मिळेल. शैक्षणिक गुणवत्तेसोबतच भावनिक स्थैर्य आणि योग्य करिअर मार्गदर्शनासाठी हा उपक्रम मोलाचा ठरेल.

या उपक्रमाची प्रभावी अंमलबजावणी व समन्वयन करण्यासाठी प्राचार्य डॉ. नरेंद्र तेंडोलकर व उपप्राचार्य डॉ. सरदार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षक समन्वयक म्हणून प्रा. डॉ. सुभाष मायंगडे, प्रा. विकास शृंगारे आणि प्रा. पिया मोरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.