गांधीजी फक्त श्रद्धांजलीपुरते हवे असणाऱ्यांना प्रश्न विचारलेले आवडत नाहीत; पोस्टची राजकीय वर्तुळात चर्चा
Raj Thackeray on Gandhi Jayanti पोस्ट सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून, राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) अध्यक्ष राज ठाकरे यांनी फेसबुक पोस्टद्वारे सत्ताधाऱ्यांवर सडकून टीका केली आहे. महापुरुषांच्या जयंती-पुण्यतिथीला केवळ पुतळ्यांना हार घालण्यापुरतेच मर्यादित न राहता, गांधीजींनी देशाला दिलेला सत्तेविरोधात ठामपणे उभे राहण्याचा विचार आजच्या काळात किती आवश्यक आहे, यावर त्यांनी भर दिला.
आपल्या फेसबुक पोस्टमध्ये राज ठाकरे यांनी सध्याच्या राजकीय वातावरणावर ताशेरे ओढले. त्यांनी लिहिले, "सध्याच्या सत्ताधाऱ्यांच्या काळात गांधीजींची आठवण अधिक प्रकर्षाने यायला हवी. कारण त्यांनी सत्तेला प्रश्न विचारायला शिकवले, आणि प्रश्न विचारणे हे सध्याच्या सत्ताधाऱ्यांना आवडत नाही. प्रश्न विचारले की ते आणि त्यांच्या समर्थकांचे ‘ट्रोलर’ तुम्हाला देशद्रोही ठरवायला आतुरच असतात."
आंदोलने, जनसहभाग आणि लोकशाही मूल्यांवर भाष्य करताना मनसे प्रमुखांनी नमूद केले की, आज आंदोलनांकडे संशयाने पाहिले जात आहे, आंदोलकांवर बळाचा वापर होतो आणि निवडणूक आयोगासारख्या घटनात्मक संस्थांच्या स्वायत्ततेवरही प्रश्न उपस्थित होत आहेत. अशा काळात गांधीजींची सर्वाधिक गरज आहे. गांधीजींनी या देशाला दिलेली सर्वात मोठी गोष्ट म्हणजे सत्तेला ‘नाही’ म्हणण्याचे सामान्य माणसाचे सामर्थ्य होय, असे प्रतिपादन त्यांनी केले.

सरकारकडे कायदा, सत्तेची पाशवी शक्ती आणि सोयीने कायदे बदलण्याची क्षमता असली, तरी सामान्य माणसाच्या सद्सद्विवेक बुद्धीवर सरकारची मालकी असू शकत नाही हे गांधीजींनी दाखवून दिले होते. आजच्या सोशल मीडिया आणि ‘व्हॉट्सॲप युनिव्हर्सिटी’च्या काळात नागरिकांच्या विचार करण्याच्या क्षमतेवरच घाला घातला जात असल्याने सर्वांनी सावध राहण्याचे आवाहन त्यांनी केले. सत्ताधाऱ्यांना गांधीजी फक्त श्रद्धांजलीपुरते हवे आहेत, पण लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी गांधीजींच्या विचारांची कायम आवश्यकता राहील, असे सांगत त्यांनी महात्मा गांधी यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन केले.













