Chiplun Crocodile Rescue: पेठमाप लोकवस्तीत आढळली मगर; वन विभागाकडून सुरक्षित रेस्क्यू करून नैसर्गिक अधिवासात मुक्त

Chiplun Crocodile Rescue: पेठमाप लोकवस्तीत आढळली मगर; वन विभागाकडून सुरक्षित रेस्क्यू करून नैसर्गिक अधिवासात मुक्त

वन विभागाच्या तत्परतेमुळे टळला संभाव्य धोका

चिपळूण : चिपळूण शहरातील पेठमाप परिसरातील विश्वदर्शन केबलजवळ गुरुवारी, १ ऑक्टोबर रोजी अचानक लोकवस्तीत मगर आढळून आल्याने नागरिकांमध्ये काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, स्थानिक नागरिक आणि वन विभागाच्या सतर्कतेमुळे मगरीला कोणतीही इजा न पोहोचवता तिचे सुरक्षित रेस्क्यू करण्यात यश आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी पेठमाप येथील नागरी वस्तीत मगर फिरताना दिसून आली. स्थानिक नागरिक रूपेश पवार यांनी यासंदर्भात विलंब न करता तातडीने चिपळूण वन विभागाला माहिती दिली. घटनेचे गांभीर्य ओळखून वन विभागाच्या पथकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. रामपूरचे वनरक्षक राहुल गुंठे, कोळकेवाडीचे वनरक्षक कृष्णा इरमले तसेच बचाव पथकातील अजय बडदे आणि अथर्व घाग यांनी घटनास्थळी पोहोचून मगरीची पाहणी केली.

हा भाग दाट लोकवस्तीचा असल्याने नागरिकांची सुरक्षा आणि मगरीचे संरक्षण या दोन्ही बाबींचा विचार करून पथकाने अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने बचावकार्य राबवले. वन कर्मचाऱ्यांनी मगरीला पकडून तिची वैद्यकीय तपासणी केली. मगर पूर्णपणे निरोगी आणि सुस्थितीत असल्याची खात्री पटल्यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार तिला सुरक्षितपणे तिच्या नैसर्गिक अधिवासात (नदीपात्रात) मुक्त करण्यात आले.

Shanti real estate 1

वन विभागाच्या या जलद आणि नियोजनबद्ध कारवाईमुळे पेठमाप परिसरातील मोठा धोका टळला असून नागरिकांनी सुटकेचा श्वास सोडला आहे. लोकवस्तीत वन्यजीव आढळल्यास घाबरून न जाता किंवा त्यांना इजा न पोहोचवता तातडीने प्रशासनाला माहिती द्यावी, असे आवाहन वन विभागाने केले आहे.

सदर यशस्वी रेस्क्यू ऑपरेशन रत्नागिरी (चिपळूण) विभागीय वन अधिकारी श्रीमती गिरिजा देसाई, सहायक वनसंरक्षक श्रीमती प्रियांका लगड, चिपळूण वनपरिक्षेत्र अधिकारी श्री. एस. एस. खान आणि वनपाल श्री. एस. एस. सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडले.