Sawarde Dervan Hospital Road Potholes: सावर्डे ते डेरवण रुग्णालयाचा रस्ता खड्ड्यात; नागरिकांमध्ये तीव्र संताप

Sawarde Dervan Hospital Road Potholes: सावर्डे ते डेरवण रुग्णालयाचा रस्ता खड्ड्यात; नागरिकांमध्ये तीव्र संताप

अत्यवस्थ रुग्ण, गर्भवती महिला आणि वृद्धांचे हाल; रस्त्याचे तातडीने डांबरीकरण करण्याची नागरिकांची मागणी

चिपळूण : तालुक्यातील अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या वाहतूक मार्गाची दैना झाली आहे. सावर्डे येथून थेट अद्ययावत अशा पंत वालावलकर रुग्णालयाकडे (डेरवण) जाणाऱ्या मुख्य रस्त्याची दुरवस्था झाली असून, वर्षानुवर्षे या रस्त्याची ही बिकट अवस्था ‘जैसे थे’ राहिल्याने रुग्ण आणि स्थानिक नागरिकांमधून प्रचंड नाराजी व्यक्त केली जात आहे.

कोकणातील अग्रगण्य आणि अद्ययावत वैद्यकीय सुविधा असणाऱ्या डेरवण येथील वालावलकर रुग्णालयात केवळ रत्नागिरी जिल्ह्यातूनच नव्हे, तर लगतच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातूनही दररोज शेकडो रुग्ण उपचारासाठी येतात. मात्र, सावर्डे ते डेरवण या संपूर्ण रस्त्यावर ठिकठिकाणी भलेमोठे खड्डे पडले असून, रस्त्यावरील खडी पूर्णपणे उघडी पडली आहे. पावसाळ्यात या खड्ड्यांमध्ये पाण्याचा साठा होत असल्याने वाहनधारकांना खोलीचा अंदाज येत नाही, परिणामी वाहने आपटून अपघातांचे प्रमाण वाढले आहे. या गंभीर परिस्थितीकडे संबंधित प्रशासन पूर्णपणे डोळेझाक करत असल्याचे चित्र आहे.

सर्वात बिकट परिस्थिती अत्यवस्थ रुग्णांची वाहतूक करणाऱ्या रुग्णवाहिकांची (ॲम्बुलन्स) होत आहे. वेगाने रुग्णालयाकडे धावणाऱ्या ॲम्बुलन्स खड्ड्यांमध्ये आपटत असल्याने रुग्णांच्या जिवाला धोका निर्माण होत आहे. तसेच, धुळीचे प्रचंड लोट सर्वत्र पसरत असल्याने श्वसनाचा त्रास होत आहे. या रुग्णालयात गर्भवती महिला आणि वृद्धांची ये-जा मोठ्या प्रमाणावर असते, ज्यांना या खडतर प्रवासाचा नाहक मानसिक व शारीरिक त्रास सहन करावा लागत आहे.

Gadre1

विशेष म्हणजे, चिपळूण-संगमेश्वर मतदारसंघाचे आमदार शेखर निकम यांच्या सावर्डे येथील मुख्य संपर्क कार्यालयापासून हा रस्ता अगदी काही मीटर अंतरावर आहे. लोकप्रतिनिधींच्या अंगणातच खड्ड्यांचे साम्राज्य पसरले असल्यासारखी स्थिती निर्माण झाल्याने स्थानिक तीव्र संताप व्यक्त करत आहेत. दररोज शेकडो वाहनांची रहदारी असणारा हा अत्यंत महत्त्वाचा आणि संवेदनशील रस्ता तातडीने डांबरीकरण करून पूर्ववत करावा, अशी आक्रमक मागणी सावर्डे व डेरवण परिसरातील ग्रामस्थांनी केली आहे.