Khed ICS College Law Seminar: खेड येथे कायदेविषयक व्याख्यान; सुजाण नागरिकत्व हीच राष्ट्राची खरी शक्ती – न्यायाधीश जी. डी. पाटील

Khed ICS College Law Seminar: खेड येथे कायदेविषयक व्याख्यान; सुजाण नागरिकत्व हीच राष्ट्राची खरी शक्ती - न्यायाधीश जी. डी. पाटील

तालुका विधी सेवा समितीतर्फे कायदेविषयक जनजागृती; ‘वैकल्पिक विवाद निवारण’ व ‘मूलभूत कर्तव्यां’वर मार्गदर्शन

खेड : तालुक्यातील विद्यार्थ्यांना कायदेविषयक साक्षरतेचे आणि सुजाण नागरिकत्वाचे धडे मिळाले आहेत. तालुका विधी सेवा समितीच्या कायदेविषयक जनजागृती उपक्रमांतर्गत सहजीवन संस्थेच्या आय.सी.एस. महाविद्यालय (खोंडे, खेड) येथे ३० सप्टेंबर २०२६ रोजी कायदेविषयक विशेष मार्गदर्शनपर व्याख्यान पार पडले.

या कार्यक्रमात प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित असलेले न्यायाधीश श्री. जी. डी. पाटील यांनी उपस्थितांना ‘वैकल्पिक विवाद निवारण पद्धत आणि त्याचे फायदे’ तसेच ‘नागरिकांची मूलभूत कर्तव्ये’ या विषयांवर सविस्तर मार्गदर्शन केले. न्यायालयीन प्रक्रियेत वेळ आणि पैसा वाचवण्यासाठी विवाद न्यायालयाबाहेर सामोपचाराने व विविध वैकल्पिक पद्धतींच्या माध्यमातून कसे सोडवता येतात, याचे महत्त्व त्यांनी विद्यार्थ्यांना पटवून दिले.

आजच्या डिजिटल युगात मोबाईलच्या वापराबाबत भाष्य करताना न्यायाधीश श्री. पाटील म्हणाले की, मोबाईल फोनचा अविवेकी वापर सामाजिक स्वास्थ्य बिघडवण्यास कारणीभूत ठरतो. त्यामुळे तरुणांनी तंत्रज्ञानाचा वापर संयमाने आणि विवेकाने केला पाहिजे. सुजाण नागरिकत्व हीच राष्ट्राची खरी शक्ती असल्याचे सांगत त्यांनी संविधानाने दिलेल्या मूलभूत कर्तव्यांचे तंतोतंत पालन करण्याचे आवाहन केले.

Aayurzil

कार्यक्रमाच्या सुरुवातीला सहजीवन संस्थेचे संचालक उत्तमकुमार जैन यांनी उपस्थितांचे स्वागत केले आणि तालुका विधी सेवा समितीच्या या कायदेविषयक जनजागृती उपक्रमाचे कौतुक केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि सूत्रसंचालन सौ. विजया भोसले यांनी केले, तर शेवटी महाविद्यालयाच्या प्राचार्या अनिता आवटी यांनी आभार मानले. या प्रसंगी महाविद्यालयातील विद्यार्थी, प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.