Devrukh Nagar Panchayat Development Fund: देवरूख शहराच्या विकासाला गती; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून ७.५ कोटींचा निधी मंजूर

Devrukh Nagar Panchayat Development Fund: देवरूख शहराच्या विकासाला गती; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून ७.५ कोटींचा निधी मंजूर

नगराध्यक्षा मृणाल शेट्ये यांच्या पाठपुराव्याला यश; शहराचा कायापालट होणार

संगमेश्वर : तालुक्यातील देवरूख शहराच्या विकासासाठी मोठी आर्थिक ताकद मिळाली आहे. देवरूख नगरपंचायतीच्या हद्दीतील मूलभूत सोयी-सुविधा आणि विविध पायाभूत विकासकामांसाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तब्बल ७ कोटी ५० लाख रुपयांचा विशेष निधी मंजूर केला आहे. या भरघोस निधीमुळे देवरूख शहरातील रखडलेल्या व प्रस्तावित विकासकामांना मोठी चालना मिळणार आहे.

देवरूख शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आणि नागरिकांना अद्ययावत नागरी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी नगराध्यक्षा सौ. मृणाल अभिजीत शेट्ये आणि त्यांच्या सहकारी नगरसेवकांनी राज्य शासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. शहरातील रस्ते, पाणीपुरवठा व्यवस्था आणि दैनंदिन गरजांशी निगडित पायाभूत सुविधा मजबूत करण्यासाठी नगरपंचायतीने विशेष प्रस्ताव सादर केला होता. या पाठपुराव्याची गांभीर्याने दखल घेत मुख्यमंत्र्यांनी ७.५० कोटींचा निधी मंजूर केला.

या महत्त्वपूर्ण निधीच्या मंजुरीसाठी भाजपा प्रदेशाध्यक्ष श्री. रविंद्र चव्हाण आणि अनिकेत पटवर्धन यांचे मोलाचे सहकार्य व विशेष योगदान लाभले आहे. शहराच्या विकासाची गरज ओळखून निधी मिळवून दिल्याबद्दल देवरूख नगरपंचायतीच्या वतीने त्यांचे विशेष आभार मानण्यात आले आहेत.

Shanti2

या निधीच्या माध्यमातून देवरूख शहरातील अंतर्गत रस्ते, पाणीपुरवठा योजना, गटारे आणि सार्वजनिक सुविधांच्या कामांना गती दिली जाणार आहे. शासनाचे सहकार्य आणि स्थानिक लोकप्रतिनिधींच्या प्रयत्नांमुळे देवरूखच्या विकासाला नवी दिशा मिळाली असून, आगामी काळात शहरातील विकासकामे अधिक वेगाने पूर्ण होतील, असा विश्वास नगराध्यक्षा सौ. मृणाल शेट्ये यांनी व्यक्त केला आहे.