मुरादपूर सबस्टेशन व अन्य अत्यावश्यक कामे मार्गी; शहर आणि ग्रामीण भागात नवीन २७ रोहित्रे (ट्रांसफॉर्मर) बसवली
चिपळूण:
Chiplun Power Supply MSEDCL Upgrades संदर्भात चिपळूण शहर आणि ग्रामीण भागातील नागरिकांसाठी मोठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. चिपळूण आणि परिसर क्षेत्रात सातत्याने होणाऱ्या खंडित वीजपुरवठ्याच्या पार्श्वभूमीवर महावितरणने युद्धपातळीवर पावले उचलत सर्व आवश्यक त्या उपाययोजना पूर्ण केल्या आहेत. याचा सकारात्मक परिणाम म्हणून गणेशोत्सवापासून चिपळूण तालुक्याच्या ग्रामीण भागासह नागरी भागात अखंड वीजपुरवठा उपलब्ध झाला असून, गणेशोत्सवात विजेची मागणी वाढूनही वीज खंडित झाली नाही. याबद्दल ग्राहकांकडून महावितरणचे आभार मानले जात आहेत.
महावितरणकडून करण्यात आलेल्या प्रमुख उपाययोजना
गणेशोत्सवापूर्वी व पावसाळ्यात वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रमाण वाढल्याने महावितरणचे कार्यकारी अभियंता धनंजय भामरे यांनी अधिकारी व कर्मचाऱ्यांची तातडीची बैठक घेऊन तातडीने कार्यवाही सुरू केली. त्या अंतर्गत खालील कामे पूर्ण करण्यात आली:
- ट्रान्सफॉर्मर क्षमता वाढ: जुना एमव्हीएचा ट्रान्सफॉर्मर बदलून नवा ट्रान्सफॉर्मर बसवण्यात आला तसेच ६३ के.व्हिए. चे २२ ट्रान्सफॉर्मर १०० के.व्हिए. क्षमतेचे करण्यात आले.
- पोल व डीपी बॉक्स बदलणे: उच्च दाब वाहणाऱ्या लाईनवरील ३६ पोल आणि एलटी लाईनवरील ६३२ पोल बदलण्यात आले. याशिवाय २७५ डीपी बॉक्स देखील बदलले आहेत.
- नवी रोहित्रे व केबल लाईन: चिपळूण शहर आणि ग्रामीण भागात २७ नवीन विद्युत रोहित्रे (ट्रांसफॉर्मर) बसवण्यात आली. तसेच लोकल विद्युतभारित तारा १७ केएम आणि उच्च दाबवाहक तारा ५० केएम बदलण्यात आल्या.
मुरादपूर सबस्टेशनमधील तांत्रिक बिघाड दूर
चिपळूण शहरातील मुरादपूर येथील सबस्टेशनमध्ये सातत्याने बिघाड होऊन वीजपुरवठा खंडित होत असे व रात्रीच्या वेळी तक्रारी वाढल्या होत्या. या सबस्टेशनमध्ये आर्द्रता वाढल्याने बाष्प पकडून वीज खंडित होत असल्याचे समोर आले. त्यावर उपाय म्हणून सबस्टेशनच्या ठिकाणी हीटर आणि एक्झॉस्ट फॅन बसवण्यात आले, ज्यामुळे ही समस्या पूर्णपणे दूर झाली असून मुरादपूर सबस्टेशन आता पूर्ण क्षमतेने सुरू झाले आहे.
ही सर्व कामे कार्यकारी अभियंता धनंजय भामरे यांच्या मार्गदर्शनाखाली अतिरिक्त कार्यकारी अभियंता दिलीप डोंगरे, ग्रामीणचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता पाटणकर यांनी महावितरणच्या कर्मचारी व कंत्राटदारांच्या सहाय्याने यशस्वीपणे पूर्ण केली आहेत. त्यामुळे विजेची समस्या आता नगण्य झाली असून नागरिकांच्या तक्रारीही कमी झाल्या आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:26 10-10-2026














