सक्षमीकरण अभियानाला जिल्ह्यात मोठा प्रतिसाद; तब्बल १२ हजार महिलांना कृषी योजनांचा लाभ घेण्याचा मार्ग मोकळा
शेतीच्या प्रत्येक टप्प्यावर राबणाऱ्या महिलांच्या कष्टांना आता शासकीय मान्यतेची मोहर मिळू लागली आहे. महिला शेतकरी म्हणून स्वतंत्र ओळख आणि कृषी योजनांचा लाभ मिळवून देणाऱ्या शासनाच्या Mahila Shetkari Sashaktikaran अभियानाला रत्नागिरी जिल्ह्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. या अभियानांतर्गत जिल्ह्यात तब्बल १ लाख १२५ महिलांनी नोंदणीसाठी अर्ज केले असून, त्यापैकी १२ हजार १३२ महिलांना अधिकृत प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले आहे. यामुळे शेतातील महिलांच्या आर्थिक स्वावलंबनासह शासकीय योजनांच्या लाभासाठी नवी दारे खुली होणार आहेत.
तालुकानिहाय नोंदणीची स्थिती
रत्नागिरी जिल्ह्यातील नऊ तालुक्यांमध्ये या अभियानाची अंमलबजावणी सुरू असून, आतापर्यंत १९६ ग्रामसभा घेण्यात आल्या आहेत. यामध्ये रत्नागिरी तालुका १८ हजार ८९१ अर्जांसह आघाडीवर आहे. त्या पाठोपाठ चिपळूणमध्ये १८ हजार ४४७, गुहागरमध्ये ११ हजार ३६७, खेडमध्ये ११ हजार २६३ आणि मंडणगड तालुक्यात ४ हजार ६२७ अर्जांची नोंद झाली आहे.

अभियानाचे महत्त्व व महिलांची स्वतंत्र ओळख
शेतीत महिलांचा मोठा सहभाग असूनही अनेकदा त्यांची स्वतंत्र शेतकरी म्हणून अधिक होत नाही. त्यामुळे कृषी योजनांचे अनुदान, आधुनिक शेती अवजारे, प्रशिक्षण आणि तांत्रिक मार्गदर्शनाच्या लाभापासून त्या वंचित राहतात. ही दरी भरून काढण्यासाठी महिला शेतकरी सक्षमीकरण अभियान अत्यंत महत्त्वाचे ठरत आहे. या प्रमाणपत्रांमुळे महिलांना कृषी विभागाच्या विविध योजनांमध्ये प्राधान्य मिळण्यास मदत होणार असून आधुनिक, नैसर्गिक व सेंद्रिय शेती तसेच कृषीपूरक व्यवसायासाठी प्रशिक्षणाची संधीही उपलब्ध होणार आहे.
राज्यभरात व्यापक प्रतिसाद आणि आवाहन
राज्यभरातही या अभियानाला मोठा प्रतिसाद मिळत असून महाराष्ट्रात ६२ लाख ७७ हजार ४९१ अर्ज प्राप्त झाले असून ९ लाख १७ हजार ३५७ प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील उर्वरित पात्र महिलांनीही कृषी विभागाच्या संकेतस्थळावर ऑनलाइन अर्ज करून या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शिवकुमार सदाफुले यांनी केले आहे













