Ratnagiri Fraud Case: कोस्टगार्ड बांधकाम उपकंत्राटात ८०.१७ लाखांची फसवणूक; चौघांवर गुन्हा दाखल

Ratnagiri Fraud Case: कोस्टगार्ड बांधकाम उपकंत्राटात ८०.१७ लाखांची फसवणूक; चौघांवर गुन्हा दाखल

करार रद्द न करता दुसऱ्या कंपनीला वर्क ऑर्डर; रत्नागिरी ग्रामीण पोलिसांकडून तपास सुरू

Ratnagiri Fraud Case च्या संदर्भात रत्नागिरी येथील कोस्टगार्ड बांधकाम प्रकल्पातील उपकंत्राटाच्या कामात पुण्यातील एका महिला इंटिरिअर डिझायनर व कंत्राटदाराची ८० लाख १७ हजार ८३६ रुपयांची फसवणूक झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी नाशिक येथील मुख्य कंत्राटदार कंपनीच्या मालकासह पुण्यातील चौघांविरुद्ध २३ नोव्हेंबर रोजी रात्री रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील वारजे (अतुलनगर, यश अपार्टमेंट) येथील रहिवासी आणि ‘अंतरा डिझाईन स्टुडिओ’च्या संचालिका अश्विनी सुनील आंबेकर (३४) यांनी रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी दिगंबर आनंदराव पिंगळे (मालक, मेसर्स प्राड इन्फ्रा कंपनी, रा. नाशिक), श्रीधर सुरेंद्र लोंढे (प्रकल्प व्यवस्थापक, रा. पुणे), दिनेश नाडगोंडे (प्रकल्प समन्वयक, रा. पुणे) आणि राजू खेतावत (मालक, श्रुती असोसिएट्स, रा. पुणे) यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे.

Ratnagiri Fraud Case: थकित बिलांची रक्कम आणि कामाचा तपशील
नाशिक येथील ‘मेसर्स प्राड इन्फ्रा’ कंपनीला कोस्टगार्ड रत्नागिरी येथे बांधकामाचा ठेका मिळाला होता. कंपनीचे मालक दिगंबर पिंगळे यांनी फिर्यादी आंबेकर यांच्याशी रितसर करार करून १५ जून २०२६ ते २० ऑक्टोबर २०२६ या कालावधीत कोस्टगार्डच्या झाडगाव येथील ‘मॅरीड अकोमोडेशन’ (एस+७ व ८ बिल्डिंग) इमारतीचे फिनिशिंग वर्क आणि मिलिटरी इंजिनिअर सर्व्हिसेसच्या ओटीएम गॅरेजचे आर.सी.सी. स्लॅब लेबर वर्क दिले होते.

Hotel star caters

फिर्यादींनी हे काम पूर्ण केल्यानंतर फिनिशिंग कामाचे अंतिम बिल ५५ लाख १२ हजार ५०५ रुपये आणि गॅरेज स्लॅब कामाचे जीएसटीसह बिल २५ लाख ५ हजार ३३१ रुपये, अशी एकूण ८० लाख १७ हजार ८३६ रुपयांची रक्कम थकीत राहिल्याचे नमूद करण्यात आले आहे.

करार रद्द न करता दुसऱ्या कंपनीला वर्क ऑर्डर दिल्याचा आरोप
आरोपी दिगंबर पिंगळे यांनी फिर्यादींच्या ‘अंतरा डिझाईन स्टुडिओ’सोबत केलेला करार अधिकृतरीत्या रद्द न करता आणि कामाचा वाद सुरू असतानाही परस्पर पुण्यातील ‘श्रुती असोसिएट्स’चे मालक राजू खेतावत यांना वर्क ऑर्डर देऊन नवा करार केल्याचा आरोप फिर्यादीत आहे. प्राड इन्फ्रासोबत काम सुरू असल्याची आणि थकित बिलांबाबत वाद सुरू असल्याची पूर्ण कल्पना असतानाही राजू खेतावत यांनी फिर्यादींचे ना-हरकत प्रमाणपत्र न घेता व त्यांच्याशी कोणताही संपर्क न साधता हा करार केला.

नव्या करारात फिर्यादींच्या येणे असलेल्या रकमेचा कोठेही उल्लेख करण्यात आलेला नाही. अशा प्रकारे सर्व आरोपींनी संगनमत करून आर्थिक फसवणूक केल्याचे फिर्यादीत म्हटले असून, रत्नागिरी ग्रामीण पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.