हल्ल्यानंतर गोवळकोट व चिपळूण परिसरात तणाव; कौटुंबिक वादातून भाडोत्री हल्लेखोरांनी मारहाण केल्याची चर्चा
चिपळूण : Koyta Gang (कोयता गँग) च्या दहशतीची घटना रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण शहरातील गोवळकोट उपनगरातील एन्रॉन ब्रिज परिसरात बुधवारी दुपारी १२.३० ते १ वाजण्याच्या सुमारास घडली असून, तीन अज्ञात गुंडांनी कोयत्यांनी केलेल्या हल्ल्यात तिघेजण गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेनंतर गोवळकोट आणि चिपळूण शहर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून, हल्लेखोर संशयित घटनास्थळावरून पळून गेले आहेत. पोलिसांकडून पसार आरोपींचा शोध सुरू असून, सायंकाळी उशिरापर्यंत परिसरात मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
मिळालेल्या माहितीनुसार, गोवळकोट व खेड येथील सासरा व जावई यांच्या कुटुंबात गेल्या काही महिन्यांपासून वाद सुरू होता. या वादाच्या पार्श्वभूमीवर मध्यंतरात दोन्ही बाजूंनी शाब्दिक वादासह भांडणाच्या घटना घडल्या होत्या. याच कौटुंबिक वादाचे पर्यवसान बुधवारी गोवळकोट रोड परिसरातील एन्रॉन ब्रिजजवळील नदीकाठच्या मैदानावर थेट कोयत्याने हल्ला करण्यात झाले. सासऱ्याने जावई आणि त्यांच्या सहकाऱ्यांना भाडोत्री हल्लेखोरांमार्फत मारहाण केल्याचे बोलले जात आहे.
Koyta Gang हल्ल्यातील जखमींवर उपचार आणि पोलिसांचा तपास

कोयत्याने केलेल्या या गंभीर हल्ल्यात जखमी झालेल्या तिघांपैकी दोघांना लाइफ केअर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, तर अन्य एका जखमीला तातडीने कराड येथील रुग्णालयात हलवण्यात आले आहे. गंभीर जखमींमध्ये खेड येथील फैजान चौगुले आणि सौद चौगुले (वय २५) यांचा समावेश असून, फैजान हा जावई तर सौद हा दीर असल्याचे बोलले जात आहे. तिसऱ्या जखमी व्यक्तीचे नाव अद्याप उपलब्ध होऊ शकलेले नाही.
घटनेची माहिती मिळताच चिपळूण पोलिसांनी सायंकाळी उशिरापर्यंत तपास सुरू करून तपासाची सूत्रे वेगाने हलवली. पोलिस ठाण्यात घटनेची नोंद करण्याची प्रक्रिया सुरू असून, सुरक्षा व्यवस्थेसाठी परिसरात बंदोबस्त ठेवण्यात आला आहे आणि पसार संशयितांचा शोध घेतला जात आहे.













