रत्नागिरी, चिपळूण, दापोली आणि गुहागरचा स्वतंत्र मतदारसंघ होण्याचा प्राथमिक आराखडा चर्चेत; लांजा-राजापूर सिंधुदुर्गला तर मंडणगड-खेडचा भाग रायगडला जोडला जाण्याची शक्यता
रत्नागिरी :
आगामी काळात देशात होणाऱ्या संभाव्य लोकसभा मतदारसंघ पुनर्रचनेच्या (Delimitation) चर्चेने कोकणातील राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. या संभाव्य पुनर्रचनेमुळे कोकणातील लोकसभा मतदारसंघांची भौगोलिक सीमा आणि राजकीय समीकरणे पूर्णपणे बदलण्याची शक्यता वर्तवली जात आहे. हा मोठा बदल आणि रत्नागिरी विधानसभा मतदारसंघाचे वाढते राजकीय महत्त्व लक्षात घेऊन सर्वच प्रमुख राजकीय पक्ष आतापासूनच मोर्चेबांधणीसाठी कामाला लागल्याचे चित्र दिसून येत आहे.
स्वतंत्र ‘रत्नागिरी’ आणि ‘सिंधुदुर्ग’ लोकसभा मतदारसंघांची शक्यता :
राजकीय जाणकारांमध्ये सुरू असलेल्या प्राथमिक चर्चेनुसार, आगामी पुनर्रचना प्रक्रियेत लोकसभा मतदारसंघांची संख्या वाढण्याची शक्यता असून त्याचा थेट परिणाम रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांच्या रचनेवर होणार आहे. सध्या चर्चेत असलेल्या संभाव्य आराखड्यानुसार, रत्नागिरी, चिपळूण, दापोली आणि गुहागर या विधानसभा मतदारसंघांचा मिळून एक स्वतंत्र ‘रत्नागिरी लोकसभा मतदारसंघ’ तयार होऊ शकतो.
लांजा-राजापूर सिंधुदुर्गला तर मंडणगड-खेड रायगडला जोडले जाण्याची चर्चा :
दुसरीकडे, या फेररचनेत रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा आणि राजापूर या विधानसभा मतदारसंघांना सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तीन विधानसभा मतदारसंघांसोबत एकत्र करून एक स्वतंत्र ‘सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघ’ आकाराला येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. याशिवाय, जिल्ह्याच्या उत्तरेकडील मंडणगड आणि खेडचा काही भाग शेजारील रायगड लोकसभा मतदारसंघाला जोडला जाऊ शकतो, अशी जोरदार चर्चा सध्या कोकणच्या राजकीय वर्तुळात रंगली आहे. या संभाव्य बदलांमुळे आगामी निवडणुकांची गणिते पूर्णपणे बदलणार असल्याने सर्वच राजकीय पक्षांनी संघटनात्मक बांधणीवर विशेष लक्ष केंद्रित केले आहे.














