SIT Inquiry: मनोज जरांगे पाटील यांची एसआयटीकडून दोन तास चौकशी; पेनड्राइव्हमध्ये ऑडिओ क्लिप सुपूर्द

SIT Inquiry: मनोज जरांगे पाटील यांची एसआयटीकडून दोन तास चौकशी; पेनड्राइव्हमध्ये ऑडिओ क्लिप सुपूर्द

क्लिप देणाऱ्या व्यक्तीचे नाव उघड करण्यास जरांगे यांचा नकार; ‘मलाही सोडू नका अन् रामदास कदम यांनाही सोडू नका’ अशी भूमिका

अंबड : SIT Inquiry (एसआयटी चौकशी) कथित ५०० कोटी रुपयांच्या व्यवहारासंदर्भातील ऑडिओ क्लिपप्रकरणी विशेष तपास पथकाने बुधवारी जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील अंकुशनगर येथे मनोज जरांगे पाटील यांच्या निवासस्थानी पोहोचून सखोल चौकशी केली. सायंकाळी ७.३० वाजता एसआयटीचे सहा अधिकारी अंकुशनगर येथील निवासस्थानी दाखल झाले आणि रात्री ९.३० वाजेपर्यंत सुमारे दोन तास चौकशी करून त्यांनी ऑडिओ क्लिप तसेच तिच्या स्रोताबाबत माहिती घेतली. या चौकशीदरम्यान जरांगे यांनी संबंधित ऑडिओ क्लिप पेनड्राइव्हमध्ये पथकाला दिली असून, पंचांच्या उपस्थितीत पंचनामा करून त्यावर जरांगे यांची स्वाक्षरी घेण्यात आली.

चौकशीदरम्यान ऑडिओ क्लिपचा मूळ स्रोत आणि ती आपल्यापर्यंत कशी पोहोचली, याबाबत जरांगे यांनी पथकाला तपशील दिला. मूळ रेकॉर्डिंग करणाऱ्या व्यक्तीने ही क्लिप आपल्या ओळखीच्या व्यक्तीकडे दिली आणि त्याच व्यक्तीमार्फत ती आपल्यापर्यंत पोहोचल्याचे त्यांनी सांगितले; मात्र क्लिप देणाऱ्या व्यक्तीचे नाव व स्रोत सध्या उघड करणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. ही क्लिप मिळविण्यासाठी टेलिग्रामचा वापर झाल्याचे सांगितले जात असले, तरी आपल्याकडे टेलिग्राम नसल्याचेही जरांगे यांनी एसआयटी अधिकाऱ्यांना सांगितले.

SIT Inquiry नंतर जरांगे पाटील यांचा पत्रकारांशी संवाद आणि पार्श्वभूमी
चौकशी पूर्ण झाल्यानंतर एसआयटीचे पथक अंकुशनगर येथून रवाना झाले आणि त्यानंतर जरांगे यांनी पत्रकारांशी संवाद साधून पथकाला दिलेल्या माहितीचा तपशील मांडला. ऑडिओ क्लिप सार्वजनिक करण्याच्या अर्धा तास आधी ती आपल्याला मिळाली होती आणि क्लिप आणून देणाऱ्या व्यक्तीच्याच मोबाइलमध्ये ती आपण ऐकली होती, असे त्यांनी नमूद केले. आपण क्लिप ऐकण्याच्या दोन तास आधी ती रामदास कदम यांच्याकडे होती, तसेच आपल्याला आणि कदम यांना क्लिप देणारी व्यक्ती एकच असावी, अशी शक्यताही त्यांनी व्यक्त केली. या प्रकरणात कोणालाही वाचवू नये, अशी भूमिका घेत ‘मलाही सोडू नका अन् रामदास कदम यांनाही सोडू नका,’ असे एसआयटी अधिकाऱ्यांना सांगितल्याचेही ते म्हणाले. काही दिवसांपूर्वी जरांगे यांनी पत्रकार परिषदेत कथित ५०० कोटींच्या व्यवहाराची ऑडिओ क्लिप सार्वजनिक केल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाच्या चौकशीसाठी एसआयटी स्थापन करण्याची घोषणा केली होती.

Shitit jyotish

ऑडिओ क्लिपची सत्यता पडताळणे, संभाषणातील आवाजांची ओळख पटविणे आणि रेकॉर्डिंगचा मूळ स्रोत शोधणे, या दिशेने एसआयटीचा तपास सुरू आहे. या पथकात सायबर सेलचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप पाटील, सहायक पोलीस निरीक्षक धनवेश पाटील यांच्यासह अन्य अधिकारी सहभागी होते, तर गोंदी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक अमोल गुरले हेदेखील उपस्थित होते. ऑडिओ क्लिप कोणी रेकॉर्ड केली, ती कोणाकडून कोणाकडे पोहोचली आणि रामदास कदम यांच्यापर्यंत कशी गेली, याचा शोध घेणे हे एसआयटीसमोर महत्त्वाचे आव्हान असून तांत्रिक तपासणी व आवाज पडताळणीनंतर तपासाची पुढील दिशा स्पष्ट होण्याची शक्यता आहे.